दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी जोरात; कोटय़वधी रुपयांची उलाढाल

उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होत असून हा चतन्याचा सण म्हणून ओळखला जातो. याची प्रचिती बाजारात वाढलेली लगबग पाहून होते. इतवारी, धरमपेठ, सराफा बाजार, सीताबर्डी, सदर येथील बाजारात नवरात्रला प्रारंभ होण्याआधी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली. पूजा साहित्य, फळे, फुले, नवरात्रीला लागणारे विशेष कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह दुचाकी आणि चारचाकी गाडय़ांचीही मोठी बुकिंग करण्यात आली. तसेच समोर येणाऱ्या दसरा व दिवाळीमुळे बाजरपेठा सज्ज असल्याचे दिसून आले.

नवरात्री उत्सवाचा मुहूर्त साधत नागपूरकरांनी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची जोरदार खरेदी केली. त्यामुळे वाहन बाजारात चांगलीच तेजी अनुभवास आली. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीकडे नागरिक वळत असल्याने इलेक्ट्रॉनिक बाजारातही चतन्याचे वातावरण अनुभवास येत आहे.

उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर अनेकांनी वाहनांसोबत टीव्ही, फ्रीज, वॉिशग मशीन विक्रेत्यांनी बाजारात नवनवीन मॉडेल्स विक्रीसाठी आणले आहेत. शोरुममध्ये विशेष सजावट केली आहे. शिवाय काही विक्रेत्यांकडे नवरात्रीसाठी विशेष खरेदी ऑफर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे बाजारात चतन्य आले असून कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील प्रत्येक भागात असलेल्या छोटय़ा-मोठय़ा बाजारात ग्राहकांची एकच गर्दी होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळाच्या झळा बाजारपेठेवरही होत्या. मात्र, नवरात्रीच्या मुहूर्तावर नागपूरच्या बाजारात खरेदीला ऊत आला आहे.

ऑनलाईन खरेदीचा फटका

सध्याच्या युवा पिढीला वेड लागले ते ऑनलाईन खरेदीचे. घरबसल्या आपल्या मोबाईलवरून अ‍ॅपच्या माध्यमातून ही मंडळी हवी ती वस्तू, कपडे, दागिने, मोबाईल मोठय़ा संख्येने खरेदी करतात. अशा वस्तूंसाठी ऑनलाईनवर सतत त्यांचा शोध सुरू असतो. शिवाय सध्या ऑनलाईन बाजारपेठेत चांगली सवलत मिळत असल्याने ‘जरा हटके’च्या प्रयत्नात चांगलीच खरेदी ही मंडळी करत आहेत. मात्र याचा बऱ्यापकी फटका शहरातील बाजारपेठेला बसत असल्याचे नाकारता येणार नाही. जाणकारांच्या मते जवळपास २० टक्के ग्राहक ऑनलाईन खरेदी करतात. त्यामुळे दुकाने थाटून बसलेल्यांवर याचा परिणाम दिसून येतो.

सणासुदीमध्ये जेवढा व्यापार वर्षभरात होतो, त्याच्या ३५ टक्के व्यापार या काळात होतो. सध्या चारचाकी आणि दुचाकी बाजारात पूर्वीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. श्राद्ध पक्ष असल्याने अनेकजण खरेदी करत नाहीत मात्र, बुकिंग करून ठेवतात. समोर दसरा व दिवाळी आहे. त्यामुळे वाहन बाजाराच्या प्रमाणात मात्र इकेक्ट्रॉनिक बाजारात प्रतिसाद कमी जाणवत आहे. तो देखील पुढील महिन्यात जोरात होण्याचे संकेत आहेत. दुचाकीशिवाय पर्याय नसल्याने आज प्रत्येक घरात दोन-चार दुचाकी दिसतात, तर ओला कॅब व उबेर टॅक्सी आल्याने चारचाकी खरेदी करण्यात वाढ झाली आहे. तसचे वाहनांवर अर्थसाहाय्य सहज मिळत असल्याने देखील लोकांचा वाहन खरेदीकडे कल वाढला आहे.

– ए.के. गांधी, अधिकृत विकेते