राज्य शासनाने केंद्राला प्रस्तावच दिला नाही

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : फुफ्फुसाशी संबंधित आजाराच्या रुग्णांवर अद्ययावत उपचार व संशोधनासाठी उपराजधानीत फुफ्फुस संशोधन संस्थेला केंद्राकडून मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन देत तसा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेडिकलला केली होती. परंतु राज्याने हा प्रस्ताव केंद्राला दिलाच नसल्याने त्याची जणू ‘भ्रूणहत्या’च झाली आहे. मेडिकलकडून विविध बदल करत तीन वेळा हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्याला सादर करण्यात आला आहे.

राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे सुमारे १४ औष्णिक विद्युत प्रकल्प विदर्भात असून येथे वायू प्रदूषणाचा स्तरही जास्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात. प्रदूषणासह धूम्रपानाच्या सवयींमुळे येथे अस्थमा, फुफ्फुसाच्या कर्करोगासह इतर आजाराचे रुग्ण जास्त आहेत. या रुग्णांवर  उपचारासाठी गडकरी यांनी मेडिकलमध्ये फुफ्फुस संशोधन संस्था केंद्राकडून मंजूर करवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी मेडिकलला प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. या प्रस्तावानुसार येथे लहान मुलांच्या श्वसन रोग विभागापासून ते मोठय़ांच्या छातीच्या शस्त्रक्रिया असे २३ विभाग प्रस्तावित होते.

१९५ खाटांचे देशातील हे पहिले केंद्र ठरणार होते. गडकरींच्या सूचनेनंतर वर्ष २०१६ मध्ये श्वसनरोग विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. एस.व्ही. घोरपडे यांनी हा प्रस्ताव राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याला पाठवला. प्रस्ताव सुमारे ६०० कोटींचा होता. त्यानंतर या प्रस्तावात सुधारणा सुचवत येथे हेलिपॅडसह इतरही सुविधा असाव्या अशा सूचना केल्याने प्रस्ताव ९०० कोटींवर गेला. तोही प्रस्ताव २०१९ मध्ये वैद्यकीय शिक्षण खात्याला दिला गेला. एवढी रक्कम शासनाकडे नसल्याचे सांगत हा प्रस्ताव परत मेडिकलला पाठवला गेला. या गोंधळात हा प्रस्ताव केंद्राकडे सादरच झाला नाही. या प्रकल्पासाठी टीबी वार्ड परिसरातील २५ एकर जागा प्रस्तावित होती. या विषयावर मेडिकलच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

प्रस्तावातील ठळक बाबी

या संस्थेत ६० खाटांचा श्वसन विभाग, ६० खाटांचा क्षयरोग विभाग, १० खाटांचा ‘ऑबस्ट्रॅक्टीव्ह एअरवे डिसीज’, पाच खाटांचा ‘इन्टरस्टीशिअल लंग डिसीज’, पाच खाटांचा निद्रा विकार, पाच खाटांचे इंटरव्हेंशनल पल्मोनरीलॉजी’, १० खाटांचे ‘इन्टरमेडिएट रेस्पीरेटरी केअर युनिट’ २० खाटांचा ‘छाती शस्त्रक्रियेचा विभाग’, तर १० खाटांचा ‘पेडियाट्रीक पल्मोनोलॉजी’ अशा २३ विभागांसह त्याच्या उपविभागांचा समावेश होता. या संस्थेसाठी १७ प्राध्यापक, ३४ सहाय्यक प्राध्यापक, ३१ वरिष्ठ निवासी डॉक्टर, ६७ कनिष्ठ निवासी डॉक्टरांची पदेही प्रस्तावित होती.

लाखात १२७ जणांचा फुफ्फुसाच्या आजाराने मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालानुसार, भारतात एक लाख लोकांमध्ये १२७ लोकांचा मृत्यू फुफ्फुसाशी संबंधित आजाराने होतो. महाराष्ट्रातही याचे प्रमाण मोठे आहे. उपराजधानीत तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर उपचाराच्या सोयी बघता शेजारच्या छत्तीसगड, तेलंगणा, मध्यप्रदेशातूनही फुफ्फुसाशी संबंधित रुग्ण मोठय़ा संख्येने येतात. त्यामुळे मेडिकलला दरवर्षी फुफ्फुसाच्या सुमारे ५० कर्करुग्णांची नोंद होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या संस्थेसाठी आग्रही आहेत. परंतु मेडिकल प्रशासनासह वैद्यकीय शिक्षण खात्याकडून या प्रस्तावाबाबत गांभीर्याने दखलच घेतली जात नाही. आताही हा प्रस्ताव नितीन गडकरींच्या माध्यमातून केंद्राला दिल्यास तातडीने त्याला मंजुरीचे प्रयत्न केले जातील.

– डॉ. विरल कामदार, संचालक, पंडित दीनदयाल उपाध्याय इन्स्टिटय़ूट.