मेडिकल, मेयो, लक्ष्मीनगर झोनला भेट

लोकसत्ता खास प्रतिनिधी

नागपूर :  नागपूर, अमरावती, यवतमाळ या तीन जिल्ह्य़ात सातत्याने  करोना रुग्ण वाढत असल्याने तीन सदस्यीय केंद्रीय पथक पुन्हा नागपुरात दाखल झाले आहे. यापैकी तिघांनी प्रत्येकी एका जिल्ह्य़ात पोहोचून तेथील करोना स्थितीचा आढावा घेतला. यातील एका सदस्याने नागपुरातील दोन रुग्णालयांसह महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन व आरोग्य उपसंचालक कार्यालयात भेट देऊन करोना स्थितीचा आढावा घेतला.

पथकात केंद्रीय आरोग्य व कुटुंब मंत्रालयाच्या सचिवांसह राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी)चे उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी आणि इतर अशा एकूण तिघांचा समावेश होता.

कुलकर्णी यांनी नागपुरातील करोनाचे सर्वाधिक रुग्ण दाखल असलेल्या मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय रुग्णालयांना भेट दिली. येथे दगावलेल्या व अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्ण का येत आहेत, याबाबत माहिती घेतली.  यापूर्वी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात भेट दिल्यावर रुग्णालयांतील मृत्यूदर कमी करण्यासाठी काय उपाय केले, याचीही पाहणी केली.

डॉ. कुलकर्णी यांच्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलूकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर उपस्थित होते. हे पथक मग शहरातील जास्त बाधित आढळणाऱ्या लक्ष्मीनगर झोनमध्ये गेले. येथे  माहिती घेतली. येथून हे पथक आरोग्य उपसंचालक कार्यालयात पोहोचले. येथे जिल्ह्य़ातील विविध विविध वैद्यकीयशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. त्यात मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल उपस्थित होते. मेडिकल, मेयोच्या अधिष्ठात्यांनी त्यांच्याकडे गंभीर अवस्थेत ऑक्सिजनचे प्रमाण ५० ते ६० झाल्यावर रुग्ण येत असल्याने येथे मृत्यूदर जास्त असून बरेच रुग्ण दगावलेल्या अवस्थेतही येत असल्याची माहिती दिली. हे रुग्ण आधी उपचाराला आल्यास मोठय़ा प्रमाणात मृत्यूदर कमी होणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. सगळ्यांचे म्हणणे पथकाने ऐकून घेतले. ते आपला अहवाल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सादर करणार आहेत.