मंगेश राऊत

देशातील विविध सुरक्षा दलांमध्ये विशेष कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दरवर्षी केंद्र सरकारकडून वेगवेगळे पुरस्कार व पदक दिले जातात. पण, बहुतांशवेळी मुदत संपल्यानंतरच पोलीस विभागाकडून माहिती देण्यात येत असल्याने इच्छा असूनही अनेकांना अर्ज करता येत नाही. पंतप्रधान सुरक्षा रक्षक पदाच्या अधिसूचनेनंतर असा विचित्र प्रकार घडत असल्याचे समोर आले.

उपराजधानीतील पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणारे अनेक अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक राज्य व देश पातळीवर व्हावे, अशी त्यांचीही इच्छा असते. त्याकरिता पोलीस आयुक्त कार्यालयामार्फ पोलीस ठाणे व विविध विभागांना विविध पुरस्काराची माहिती देण्यात येते. पोलीस आयुक्त कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयांना ही माहिती पोलीस महासंचालक कार्यालयाकडून मिळते. पण, अनेकदा पुरस्काराची मुदत निघून गेल्यानंतर त्यासंबंधिचे पत्र पोहोचते. हा अनुभव राज्यातील बहुतांश पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आला असेल. पण, उपराजधानीत नुकताच अनुभवास आला.

पोलीस दल व सुरक्षा दलांमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्यांना पंतप्रधान जीवन रक्षा पदक देऊन गौरवण्यात येते. २०२० च्या पदकासाठी केंद्र सरकारकडून अर्ज मागवण्यात आले.  त्याचे पत्र पोलीस महासंचालक कार्यालयाने २६ ऑगस्टला सर्व पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि विविध सुरक्षा विभाग प्रमुखांना पाठवले. नागपूर पोलीस आयुक्तालयाला हे पत्र ६ सप्टेंबरला मिळाले. पोलीस आयुक्तालयातून हे पत्र पोलीस ठाण्यांमध्ये १० सप्टेंबरला पोहोचले. पत्रातील माहितीनुसार, पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० सप्टेंबर होती.  परिणामी अनेकांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याची इच्छा असतानाही केवळ मुदत संपल्याने त्यांचा हिरमोड झाला. एकतर उपराजधानीतील बोटावर मोजण्या इतक्याच पोलिसांनाच केंद्रीय पदक मिळते. त्यातही अशाप्रकारे ते स्पध्रेतून बाद होत असतील, तर त्यांच्या कामाचे कौतुक कसे होईल, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. ही परिस्थिती राज्यभरात सर्वत्र आहे.  कर्मचारी व अधिकाऱ्यांनी वेगवेगळे पुरस्कार व पदकांसाठी अर्ज करावे व त्याची माहिती निर्धारित वेळेत संबधितांपर्यंत पोहोचावी, यासाठी विभागाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

करोनाबळी ठरलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना धनादेश प्रदान

करोनाच्या लढय़ात  दोन पोलिसांचा मृत्यू झाला. त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आज पोलीस आयुक्त आणि सहआयुक्तांच्या हस्ते ५० लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.  नागपूर पोलीस आयुक्तालयात कार्यरत सहायक फौजदार भगवान सखाराम शेजूळ (पोलीस मुख्यालय) आणि पवालदार सिध्दार्थ हरिभाऊ सहारे (पो.स्टे.धंतोली) हे दोन्ही पोलीस कर्मचारी  कर्तव्य बजावत असतांना करोनाने आजारी पडले होते. त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार व सह पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे याच्या हस्ते ५० लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने उपस्थित होते.

विविध पुरस्कार व पदकांसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज करावेत, यासाठीच विभागाकडून प्रयत्न केले जातात. कदाचित मुंबईहून नागपुरात पत्र यायला उशीर झाला असेल. दरवर्षी उपराजधानीतील जवळपास ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव पुरस्कारांसाठी पाठवले जातात. अनेकांना पदकही मिळते. यात नागपूर पोलीस दलाचीची प्रतिमा उजळते. हे पत्र पोलीस ठाण्यांमध्ये उशिरा पोहोचण्याचे कारण समजून घेऊ. पण,  निश्चितच हे कुणी जाणीवपूर्वक केलेले नाही.

– गजानन राजमाने, पोलीस उपायुक्त, मुख्यालय.