प्रकल्पासाठी २११७ कोटी मिळणार; जागतिक बँकेच्या चमूसोबत  दिल्लीत बैठक

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर :  नागपूरची ओळख असलेल्या नाग नदीतील प्रदूषण कमी करणाऱ्या २११७.५४  कोटी रुपयांच्या प्रकल्पाला रविवारी केंद्र सरकारने मंजुरी  दिली. यामुळे  नाग नदीची जैवविविधता संवर्धन होऊन पुनरुज्जीवन शक्य होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने हा प्रकल्प मंजूर झाला आहे. आज जागतिक बँकेच्या चमूसोबत नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत गडकरी यांनी ही घोषणा केली. महापालिकेचे आयुक्त या बैठकीला उपस्थित होते.

नाग नदी संवर्धन प्रकल्प २११७.५४  कोटी रुपयांचा असून राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पांतर्गत ही मंजुरी मिळाली आहे. हा नितीन  गडकरी यांचा हा ‘ड्रिम प्रोजेक्ट’आहे. शहराच्या मध्यभागातून वाहणारी नागनदी सांडपाणी आणि औद्य्ोगिक क्षेत्रातून निघणाऱ्या घाण पाण्यामुळे प्रचंड  प्रदूषित झाली आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहेत. नागनदीमध्ये प्रक्रिया न केलेले सांडपाणी, कचरा टाकला जातो. नदीला मिळणारे नाले आणि उपनद्या यातून होणारे प्रदूषणही कमी करण्यासाठी संचालनालय काम करणार आहे. नागनदीचे पाणी स्वच्छ व्हावे व प्रदूषण पूर्णत: दूर व्हावे यासाठी  गडकरी यांचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. या नदीच्या पाण्यातून जलवाहतूक व्हावी, असाही त्यांचा प्रयत्न आहे. आपण स्वत: अंबाझरी ते पारडीपर्यंत नदीतून नावेने जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत मंजूर हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय, एनआरसीडी राबवणार आहे. नागनदी आणि तिच्या उपनद्यांमधील प्रक्रिया न झालेले सांडपाणी, घनकचरा  आणि अन्य अशुद्ध  घटकांच्या बाबतीत प्रदूषणाची पातळी या प्रकल्पामुळे कमी होईल.

या प्रकल्पाचा एकूण खर्च २११७.७१ कोटी असून यात केंद्र शासन, राज्य शासन व नागपूर महापालिका यांना अनुक्रमे ६०, २५ व १५ टक्के या प्रमाणात वाटा द्यायचा आहे. यानुसार केंद्र सरकारकडून ६० टक्के म्हणजे १३२३.५१ कोटी, राज्य शासनाकडून २५ टक्के म्हणजे ४९६.३८ कोटी व महापालिकेकडून १५ टक्के म्हणजे २९७.८२ कोटी खर्च केले जाणार आहे.

प्रकल्पातील प्रमुख मुद्दे

नागनदीची एकूण लांबी ६८ किमी.

शहरी भागात नागनदीची लांबी १५.६८ किमी.

नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत ९२ एमएलडी क्षमतेचे तीन नवे एसटीपी.

सध्याचे १० एमएलडी क्षमतेचे एसटीपी अद्ययावत होणार.

प्रकल्पातील मॅनहोल वळवण्यात येतील.

४८.७८ किमी इंटरसेप्टर गडर.