• पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकप्रतिनिधींशी संवाद
  • १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान विविध कार्यक्रम राबवणार

केंद्र सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी १४ एप्रिल ते ५ मे या काळात  ८ कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातील लोकप्रतिनिधींशी दूरध्वनीवरून संवाद साधून वरील कार्यक्रमांची माहिती दिली. देशातील ११५ जिल्हे विकासकामात मागे असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी ११ ते १२ या वेळेत खासदार व आमदारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यानुसार १४ एप्रिलला सरकारने केलेल्या कामांची लोकांना माहिती देणे, १८ एप्रिलला स्वच्छता अभियान, २० एप्रिलला उज्ज्वला दिवस, २४ एप्रिल पंचायत राज दिवस, २८ एप्रिल ग्राम सक्षमीकरण आणि गावागावात वीज जोडणी, ३० एप्रिलला आयुष्यमान भारत अंतर्गत गावातील लाभार्थ्यांची यादी तयार करणे, २ मे रोजी शेतकरी कल्याण दिवस आणि ५ मे रोजी कामगार दिवस साजरा करायचा आहे. १४ एप्रिलला अभियानाला  छत्तीसगडमधील विजापूरमधून सुरुवात केली जाणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत, असे  भाजपचे आमदार अनिल सोले यांनी दिली. प्रत्येक खासदार आणि आमदाराला त्यांच्या मतदारसंघात पंतप्रधानांनी दिलेला कार्यक्रम राबवायचा आहे. त्या दृष्टीने स्थानिक पातळीवर  नियोजन केले जाणार आहे, असे सोले म्हणाले.

संसदेमध्ये विरोधकांनी घातलेल्या गदारोळामुळे  कामकाज  होऊ शकले नाही. त्या विरोधात गुरुवारी  भाजप देशभर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. यात सहभागी होऊन लोकांशी संवाद साधण्याबाबत सांगण्यात आले.