भारतात बिस्किटांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे तसेच विदर्भात मोठी बाजारपेठ आहे. ‘बिस्क फार्म’सारख्या कंपन्यांनी विदर्भात उत्पादन सुरू केल्याने भविष्यात मध्यभारत बिस्कीट निर्मितीचे मोठे हब होणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ते बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ‘साज फूड प्रॉडक्ट’च्या ‘बिस्क फार्म’ कारखान्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सरपंच अनिता ठाकरे, बिस्क फार्मचे संचालक के.डी. पॉल, आमदार समीर मेघे यावेळी उपस्थित होते.

पूर्व भारतात ‘बिस्क फार्म’ने मोठी ताकद निर्माण केली आहे. आता त्यांचे उत्पादन मध्य भारतात आल्याने याचा फायदा येथील जनतेला मिळेल. गडकरी यांनी पाच वर्षांत पन्नास हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय बाळगले असून ही त्याचीच एक सुरुवात आहे, असे फडणवीस म्हणाले. इतर राज्याच्या तुलनेत विदर्भात औद्योगिक वापरासाठी विजेचा दर कमी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या नागपूरला येत आहेत. या कंपन्यांना भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असेही त्यांनी सांगितले. के.डी. पॉल म्हणाले की, बिस्कीटाला लोकांनी पसंती दर्शवल्यामुळेच आम्ही पाचवी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. १९७४ साली बिस्का फार्मने छोटय़ा स्वरूपात उद्योगाला सुरुवात केली होती. पुढे विस्तार करण्याचा आमचा मानस असून स्थानिक कर्मचाऱ्यांना अधिक रोजगार आम्ही देऊ.

नागपुरात जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर

सध्या राज्यात औद्योगिक वातावरण पोषक आहे. मुंबई येथे १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २०१८’ ग्लोबल समिट आयोजित करण्यात आली असून नागपूर-विदर्भात गुंतवणूक वाढीसाठी ही चांगली संधी आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या (बीएमए) एम.के. गोयल सभागृहाच्या उद्घाटनावेळी त्यांनी बुटीबोरीसाठी अनेक घोषणा केल्या. मेट्रो बुटीबोरी एमआयडीसीपर्यंत नेली जाईल, उड्डाण पूल बांधण्यात येईल, ग्रामपंचायत कायद्यात बदल केला जाईल असे सांगून असोसिएशनच्या मागणीची दखल घेत नागपुरात जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर तयार करण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगितले. यासाठी २५० एकर जागेची गरज असून ती मिळाल्यावर काम सुरू केले जाईल. विजेचे दर स्थिर ठेवण्यासाठी वीज विभागाला प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहे. बुटीबोरी एमआयडीसी परिसरात २२० केव्हीचे विद्युत उपकेंद्र उभारण्यास ऊर्जामंत्र्यांनी संमती दिली आहे, असे त्यांनी सांगितले. मुंबईत होणाऱ्या ‘ग्लोबल समिट’ मध्ये विदर्भ-नागपूर साठी एक स्वतंत्र कक्ष राखून ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून विदर्भात गुंतवणूक आकर्षति करण्याची संधी प्राप्त होणार आहे. यात विदर्भातील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. संचालन मििलद कानडे यांनी केले. यावेळी बुटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे पदाधिकारी व उद्योजक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.