भरती सुरू होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार

नागपूर : राज्यात रखडलेल्या प्राध्यापक भरतीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून नेट, सेट पात्रताधारकांची दिशाभूल केली जात आहे. वारंवार आश्वासन देऊनही प्राध्यापक भरती होत नसल्याने महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेने राज्यभरात विविध ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले. नागपूर येथील उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर सोमवारपासून नव प्राध्यापकांनी बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात केली. तर काहींनी संविधान चौकात आंदोलन करीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

राज्यात रखडलेल्या प्राध्यापक भरतीमुळे १८ हजारांवर पदे रिक्त आहेत. ४ मे २०२०च्या शासननिर्णयानुसार प्राध्यापक भरती बंद करण्यात आली. त्यामुळे नेट, सेट, पीएच.डी. पात्रताधारक प्रचंड नैराश्येत आहेत. मागील वर्षी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी  सप्टेंबर २०२० ला करोना नियंत्रणात येताच शंभर टक्के प्राध्यापक भरती करण्याचे आश्वासन दिले होते.  परंतु, जानेवारी २०२१ पर्यंत यासंदर्भात कुठलीही कार्यवाही झालेली नाही. करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यामुळे पुन्हा प्राध्यापक भरतीचा मुद्दा थंडबस्त्यात गेला. मात्र, मार्च २०२१ नंतर नेट, सेट पात्रताधारक संघटनांनी प्राध्यापक भरतीसाठी आक्रमक पवित्रा घेतल्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी लवकरच प्राध्यापक भरती केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मे २०२१ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वित्त विभागाने ४० टक्के प्राध्यापक भरतीसाठी मान्यता दिल्याचे उदय सामंत यांनी सामाजिक माध्यमांतून सांगितले होते. मात्र, त्यानंतरही प्राध्यापक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात अद्यापही कुठला ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नव प्राध्यापक संघटनेने राज्यव्यापी साखळी उपोषण सुरू केले आहे. सरकार प्राध्यापक भरतीसंदर्भात शासन निर्णय जाहीर करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.