शहर काँग्रेस कार्यकारिणीसाठी जुळवाजुळव

विविध गटा-तटात  विभागलेल्या शहर काँग्रेसला एका सूत्रात बांधून नवीन शहर कार्यकारिणी जाहीर करण्याची तयारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी सुरू केली आहे. सक्रिय कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देतानाच अकार्यक्षम नेत्यांना डच्चू दिला जाणार आहे. दीड वर्षांवर आलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा बदल होणार आहे. ठाकरे यांना प्रदेशाध्यक्षांकडून यापूर्वीच हिरवा कंदील मिळाला आहे.

नागपूरचा शहराध्यक्ष बदलून दीड वर्षांपासून अधिक काळ झाला. परंतु कार्यकारिणी बदलण्यात आली नाही. प्रारंभी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी गटातील कार्यकर्त्यांची नाराजी न पत्करण्याची भूमिका घेण्यात आली. परंतु दोन्ही महत्त्वाच्या निवडणुकीत पराभव झाल्यावर पक्ष आणखी ‘बॅकफूट’वर जात असल्याने परिस्थिती जैसे थे ठेवण्यावर भर देण्यात आला. आता मात्र जेमतेम एक वर्षे महापालिका निवडणुका असून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी फेरबदल करणे आवश्यक वाटू लागले आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी संमती दर्शविली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कार्यकारिणी घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहर कार्यकारिणीसोबत ब्लॉक अध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि विविध आघाडय़ांच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नवीन कार्यकारिणीत शहरातील सर्व माजी मंत्र्यांच्या गटांतील कार्यकर्त्यांना संधी मिळणार असलीतरी अकार्यक्षम कार्यकर्त्यांना कार्यकारिणीतून वगळण्यात येणार आहे. प्रारंभी दिवाळीनंतर कार्यकारिणी जाहीर करण्याचे सांगण्यात येत होते. परंतु कधी नव्हे एवढे बचावात्मक पवित्र्यात शहराध्यक्ष असल्याचे दिसून येते. महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वसमावेशक यादीवर भर दिला जात आहे. कोणत्याही पदावर नसलेले पण पक्षात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता नसल्याने शहरातील सर्व नेते एकदिलाने काम करण्यासाठी सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. हे देखील कार्यकारिणीत फेरबदलास विलंब होण्याचे प्रमुख कारण आहे.स्थानिक नेत्यांची नाराजी ओढवून न घेता सर्वाकडून पसंतीची नावे मागवण्याची सूचना चव्हाण यांनी केली होती. परंतु अद्याप स्थानिक नेत्यांनी स्वतहून कार्यकारिणीसाठी किंवा ब्लॉक अध्यक्षांसाठी नाव दिले नाही. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी कार्यकारिणी जाहीर करण्याची योजना बारगळली आहे. माजी शहराध्यक्षांची कार्यकारिणी असलीतरी पक्ष संघटनेच्या कामावर फारसा काही परिणाम झालेला नाही. निष्ठावान कार्यकर्ते सातत्याने पक्षासाठी काम करीत आहेत. मात्र, त्यांना पदे दिल्यास ते आणखी जोमाने काम करण्यास प्रवृत्त होतात. हे बघता शहराध्यक्षांनी स्थानिक नेत्यांच्या गटातील नावांना फार छेडछाड न करता कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब करण्याचे ठरविले आहे, असे सूत्रांनी सांगितले.