• १८ कोटीचे कंत्राट देऊनही कंपनीकडून पुरवठा बंद

  • प्रत्येक झोनमध्ये ७० उघडे मेनहोल्स

नागपूर : शहरातील विविध भागातील मेनहोल्सवर लावण्यात येणाऱ्या (चेंबर) झाकणांचे कंत्राट गुजरातमधील एका कंपनीला दिले असताना पावसाळा तोंडावर आला असताना या कंपनीकडून अद्याप पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे ४ हजारपेक्षा चेंबरवर झाकणे नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे दीड वर्षभरापूर्वी या कंपनीला १८ कोटीचे रुपयाचे कंत्राट देण्यात आले होते. यास  स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली होती.

शहराचा झपाटय़ाने विस्तार होत असून स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. अनेक ठिकाणी विविध विकास कामे सुरू असताना मेनहोल्सवरील झाकणे तुटलेली आणि तर काही ठिकाणी झाकणे नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या उघडय़ा मेनहोल्सची समस्या कायम आहे. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी नालेसफाई आणि चेंबरवरील झाकणांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. शहरात रस्त्यावर आणि उद्यानातील मेनहोल्सवर झाकणे लावण्याचे कंत्राट गुजरातमधील एका सत्तापक्षाशी संबंधित व्यक्तीला देण्यात आले. गेल्या वर्षभरात करोनाच्या काळात विकासकामे थांबली असताना संबंधित कंत्राटदाराकडून त्याचा पुरवठा करण्यात आला नाही. यामुळे या कंत्राटदाराला आता नोटीस देण्यात आली आहे.

पावसाळ्यापूर्वी दरवर्षी रस्त्यांवरील मेनहोल्सवर झाकणे लावण्याचे आदेश दिले जाते. त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे मुसळधार पाऊस आला की या उघडय़ा मेनहोलमुळे अपघात होतात. शहरात ठिकठिकाणचे असे उघडे मेनहोल अपघातासाठी कारणीभूत ठरू शकतात. काही ठिकाणी तर मेनहोल्सना कचराघर बनवण्यात आले आहे. शहरात दहा झोन असून २४ हजारावर  मेनहोल्स आहेत.

प्रत्येक झोनमध्ये उघडय़ा मेनहोल्सची संख्या ७० ते ८०च्या घरात असली तरी आरोग्य विभागाकडे मात्र तशी आकडेवारी नसल्याचे सांगण्यात आले. सर्वात जास्त उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण नागपुरात उघडय़ा मेनहोल्सची संख्या जास्त आहे. उच्चभ्रू लोकांची वस्ती समजल्या जाणाऱ्या सिव्हिल लाईन्ससारख्या परिसरात अनेक ठिकाणी फुटपाथवरील मेनहोल्सला झाकणे नाही. या झाकणांसाठी महापालिकेकडून दरवर्षी लाखो रुपयाची तरतूद केली जाते. याव्यतिरिक्त नगरसेवकांच्या वॉर्ड निधीतूनही ही कामे केली जातात. महापालिकेच्याच बांधकाम विभागाची यावर देखरेख असते तरीही या उघडय़ा मेनहोल्सच्या समस्येकडे कुणाचे लक्ष जात नाही. महापालिकाही त्याची दखल घेत नसल्याचे दिसते.

शहरातील नाल्यावरील चेंबर झाकणाचे कंत्राट गेल्यावर्षी एका गुजरातमधील कंत्राटदाराला देण्यात आले होते. त्यावेळी त्यांची निविदा मंजूर करण्यात आली होती आणि १८ कोटी रुपयांचे हे कंत्राट होते ते महापालिकेला आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. शहरात अजूनही त्यांच्याकडून झाकणांचा पुरवठा करण्यात आला नसून त्यांनी काही स्थानिक कंत्राटदाराला काम दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करावी लागेल.

– प्रकाश भोयर, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका