‘उत्कर्ष महामार्ग’ टोलमुक्त: चंद्रकांत पाटील यांची घोषणा

‘टोलमुक्त महाराष्ट्र’ ही राज्य सरकारची भूमिका कायम असून, ‘हायब्रीड अ‍ॅन्युइटी’ तत्त्वानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘उत्कर्ष महामार्ग’ योजनेद्वारे राज्यात बांधण्यात येणारे दहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सर्व वाहनांसाठी टोलमुक्त असतील, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मात्र, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील  टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा प्रस्ताव आर्थिकदृष्टय़ा सरकारला परवडणारा नसल्याने मुंबई-ठाणेकरांवरील टोलचा भार कायम राहणार असल्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले.

‘उत्कर्ष महामार्ग’ अंतर्गत राज्यातील १० हजार किमीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी हायब्रीड अ‍ॅन्युइटी मॉडेलच्या (टप्प्या टप्प्याने वार्षिक रक्कम कंत्राटदारांना प्रदान करून) सुधारित तत्त्वांना सरकारने मान्यता दिली आहे. सुमारे ३० हजार कोटी रुपये खर्चून हे रस्ते बांधण्यात येणार आहेत.  या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती असलेल्या कंत्राटदारांनी सहभागी व्हावे यासाठी पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच व्हिडीओ कॉन्फरन्स, वेबचॅट तसेच ईमेलच्या माध्यमातून दक्षिण कोरिया, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, इंग्लड आदी सात देश आणि देशातील १८ राज्यांतील रस्ते बांधणीत पारंगत असलेल्या कंपन्यांशी संवाद साधला होता. विधानसभेत शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासात, टोलमुक्त महाराष्ट्राचे काय झाले असा सवाल अजित पवार यांनी केला होता. त्यावर बोलताना टोलमुक्त महाराष्ट्र ही आमची भूमिका आजही कायम असून नव्याने खाजगीकरणाच्या माध्यमातून तयार होणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर एसटी आणि हलक्या वाहनांना टोल लागणार नाही असा निर्णय सरकारने पूर्वीच घेतला आहे. आता यापुढच्या टप्यात उत्कर्ष महामार्ग योजनेतून होणाऱ्या १० हजार किमी लांबीच्या रस्त्यांवर कोणत्याही प्रकारच्या वाहनांना टोल न आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पाटील यांनी या वेळी दिली.