अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन वाद निर्माण झाला असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील सावनी तालुक्यात एका महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली असून सखूबाई कस्तुरे (वय ५५) असे या मृत महिलेचे नाव आहे.
अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतर वाघांचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. चंद्रपूरमधील सावली तालुक्यातील पंधरु गावात राहणारी सखूबाई कस्तुरे ही महिला शुक्रवारी शेतात कामासाठी गेली होती. शुक्रवारी संध्याकाळ झाली तरी त्या घरी परतल्या नव्हत्या. शेवटी रात्री कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला असता सखूबाई यांचा मृदेह सापडला. शेतालगतच त्यंचा मृतदेह सापडला असून त्यांच्या शरीरावर वाघाच्या नखांचे ओरबडे आहेत. यावरुन वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी, अमरावती जिल्ह्यातही २३ ऑक्टोबर रोजी वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता. जनावरांसाठी चारा गोळा करण्याकरिता गेलेला एक शेतमजूर वाघाच्या हल्ल्यात बळी पडल्याची घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी येथे घडली होती. याच भागात १९ ऑक्टोबररोजीही वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 10, 2018 10:08 am