राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा धक्का लागून मागील चाकात सापडलेल्या एका चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) तरुणीचा अपघाती मृत्यू झाला. प्रेरणा गंगाधरराव काकडे (२६, रा. सौंसर) असे मृतमुलीचे नाव असून, सीताबर्डी येथे एका खासगी वसतिगृहात ती राहात होती. प्रेरणा ही मिहान इंडिया लिमिटेड कंपनीत लेखा अधिकारी म्हणून नोकरी करीत होती.
प्रेरणाचे वडील सौंसर येथे शेती करतात. तिला दोन मोठय़ा बहिणी आणि एक भाऊ आहे. ती सर्वात लहान होती. दोन्ही बहिणींचे लग्न झाले असून, भाऊ आणि ती अविवाहित होती. अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करून तिने दोन वर्षांपूर्वी सी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिला मिहान इंडिया लिमिटेड कंपनीत लेखा अधिकारी म्हणून चांगल्या पगाराची नोकरी लागली. वडील शेतकरी असल्याने घरची धुरा तीच सांभाळायची. तीन महिन्यांपूर्वी प्रेरणाने कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. आपल्या यशाचा आनंद तिने कार्यालयात सर्वाबरोबर एकत्र साजरा केला होता. मिहान इंडिया लिमिटेड कंपनीची अंतर्गत क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. काल गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ती कंपनीच्या चमुला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर होती.
आज सकाळी १० वाजता ती कार्यालयात जाण्यासाठी आपल्या दुचाकी (आय एमएच-३१, ईएस-८२६० )ने वसतिगृहाबाहेर पडली. सकाळच्या सुमारास वीज नसल्याने रहाटे कॉलनी चौकातील सिग्नल वाहतूक पोलीस सांभाळत होते. १०.१५ च्या सुमारास ती जनता चौकाकडून वर्धा मार्गावर जाण्यासाठी रहाटे कॉलनी चौकात पोहोचली. त्यावेळी सिग्नल सुरू होता. तिने समोर उभ्या असलेल्या एमएच-४०, वाय-५२७३ क्रमांकाच्या नागपूरहून चंद्रपूरला जाणाऱ्या बसच्या डावीकडून गाडी काढण्याचा प्रयत्न केला. फूटपाथ आणि बसमध्ये एकदम अरुंद जागा होती. त्या जागेतून गाडी काढताना तिला बसचा धक्का लागला आणि ती दुचाकीसकट खाली कोसळली. परंतु बसचालकाचे त्याच्या डाव्या बाजूला लक्ष नसल्याने त्याने बस तशीच पुढे नेली. त्यामुळे बसचे मागील चाक मुलीच्या डोक्याला घासून गेले. हा सर्व प्रकार रहाटे चौकाकडून जनता चौकाकडे जाण्यासाठी सिग्नलवर उभ्या असलेल्या वाहनचालकांना दिसला. वाहतूक पोलिसांनी ताबडतोब वाहतूक थांबवली आणि नागरिकांच्या मदतीने प्रेरणाला जवळच्या शत:यु रुग्णालयात दाखल केले.
प्रेरणाच्या डोक्याच्या उजव्या बाजूला अतिशय गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. ही माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर तिच्या बॅगमधील ओळखपत्रावरून मिहान इंडिया लिमिटेड प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. कंपनीतील लोकांनी ताबडतोड तिच्या घरी कल्पना दिली. मुलीच्या अपघाताची माहिती मिळताच तिची आई आणि भाऊ नागपुरात दाखल झाले. मुलीच्या अकाली मृत्यूने तिची आई व भावाचे दु:ख अनावर झाले होते. प्रेरणाच्या मित्र-मैत्रिणींनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

मित्र-मैत्रिणींनाही अश्रू अनावर
प्रेरणा ही सुस्वभावी आणि मनमिळावू होती. ती आपल्या कामात अतिशय तरबेज होती, अशी माहिती मिहान इंडियाचे लिमिटेडचे कंपनी सेक्रेटरी नवीन बक्षी यांनी दिली. तिच्या अपघाती निधनाने तिच्या कंपनीतील सहकाऱ्यांना तीव्र दु:ख झाले. रुग्णालयात आलेल्या सर्व सहकाऱ्यांनाही यावेळी अश्रू अनावर झाले.

तरुणांनी हेल्मेट घालावे

सकाळी १० ते संध्याकाळी ६ या काळात मिहान इंडिया लिमिटेडचे कार्यालयीन काम होते. ती कार्यालयाला येण्यासाठी निघाली असावी आणि हा अनर्थ झाला. तिने कदाचीत हेल्मेट घातले असते तर तिचा जीव वाचला असता. त्यामुळे युवकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वत:च्या संरक्षणासाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन नवीन बक्षी यांनी यावेळी केले.