वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यास २०१८ मध्ये टाळाटाळ

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या ‘शिवाजीचे उदात्तीकरण-पडद्यामागचे वास्तव’ पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी २०१८ मध्येच करण्यात आली होती. परंतु त्या वेळी भाजप सत्तेत असताना त्यावर काहीच कारवाई झाली नाही आणि आता सत्तेबाहेर येताच त्या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. पुण्यातील शिळीमकर यांनी २९ एप्रिल २०१८ रोजी विश्राम पोलीस ठाण्यात यासंदर्भात एफआयआर केले होते. मात्र, त्या वेळी सत्तेत असलेल्या भाजपने त्याची दखल घेतली नाही, असा आरोप तक्रारकर्त्यांचा आहे.

डॉ. विनोद अग्रवाल या नागपुरातील लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय अपमानजनक असे ‘शिवाजीचे उदात्तीकरण-पडद्यामागचे वास्तव’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यावर बंदी घालण्याची आणि लेखकावर कारवाई करण्याची मागणी नागपुरात सोमवारी भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली. शिळीमकर यांनी २०१८ ला या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

‘‘मी पुस्तक वाचलेले नाही. मात्र महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर त्या पुस्तकावर बंदी घालणेच योग्य आहे. महाराजांबद्दल वाईट लिखाण करणाऱ्या प्रत्येक पुस्तकावर बंदी घालण्याचे काम महाराष्ट्र सरकार करेल, याची हमी देतो. मात्र, महाराजांवरील बदनामीकारक पुस्तकाबद्दल भाजपने मागणी करावी, हे आश्चर्यकारक आहे. भाजप मतांसाठी कोणत्या स्तरावर जाते हेच या प्रकरणातून दिसून येते.– विजय वडेट्टीवार, बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री.