अभियंता तरुणीसह दोघांना अटक

भारतीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) घेण्यात आलेल्या कंबाईन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिस परीक्षेकरिता एका उमेदवार तरुणीने मोबाईलवरून प्रश्नपत्रिका तिच्या  मित्राला पाठवली व त्याच्याकडून उत्तर मिळवले. हा धक्कादायक प्रकार रेशीमबागेतील जामदार शाळेच्या केंद्रावर घडला.  पोलिसांनी गुन्हा दाखल करून अभियंता तरुणीसह तिच्या मित्राला अटक केली आहे. तिचा मित्रही अभियंता असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो.

अश्विनी जनार्दन सरोदे (२३) रा. अंजनवती, धामनगाव, अमरावती शुभम भास्करराव मुंदाने (२५) रा. कोहळे लेआऊट, खडगाव रोड, वाडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भारतीय लष्कराच्या विविध शाखांमधील विविध तांत्रिक व कार्यालयीन पदे भरण्यासाठी यूपीएससीकडून कंबाईन्ड डिफेन्स सव्‍‌र्हिसेस परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा काल, १८ नोव्हेंबरला देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेचे एक केंद्र रेशीमबागमधील जामदार हायस्कूलमध्ये होते. अश्विनी हिने परीक्षेचा अर्ज भरला होता. तिने परीक्षा केंद्रात मोबाईलसह प्रवेश केला. प्रश्नपत्रिका हाती येताच तिने त्याचे छायाचित्र मोबाईलद्वारे काढून घेतले व शुभमच्या व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवले. त्यानंतर त्याने तिला प्रश्नांची उत्तरे पाठवली. यावेळी परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना तरुणीचा संशय आला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चलचित्र तपासले व महिला कर्मचाऱ्याकडून तिची झडती घेतली. त्यावेळी तिच्याजवळ मोबाईल सापडला. तसेच तिने व्हॉट्स अ‍ॅपवरून मित्राला प्रश्नपत्रिका पाठवली असून उत्तर विचारल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक विनय दत्तात्रय निमगावकर (५१) रा. समर्थ नगरी, सोनेगाव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी गुन्हा दाखल करून तरुणीसह उत्तर देणाऱ्या तरुणालाही अटक केली.