जन्मांध असलेला चेतन उचितकर हा सहावीतील मुलगा कलेतून मिळणाऱ्या मानधनातून अंधाऱ्या घरांमध्ये सौरऊर्जा पुरवत असून त्याच्या प्रतिभेमुळेच इतर सात अंध भावंडांना स्वाभिमानाने जगण्याचे बळ मिळाले.
वाशिमपासून ६ किलोमीटरवरील केकतुमरा गावाजवळच्या शेतात उचितकर कुटुंब वास्तव्याला आहे. त्यात चेतनच्या आईवडिलांबरोबरच आजी, मोठी बहीण चेतना आणि आणखी सात अंध भावंडे राहतात. साधारण कुटुंबाप्रमाणेच चेतनचे वडील पांडुरंग आणि आई गंगासागर यांनी चेतनच्या दृष्टीसाठी भरपूर प्रयत्न केले, पण व्यर्थ. त्यापेक्षा त्याला घडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्याच्या पालकांना वाटले आणि त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले. चेतनला कथाकथन, शास्त्रीय संगीत, वेगवेगळी वाद्ये वाजवण्यात गती आहे. शास्त्रीय संगीतातील एकूण ३६ प्रकारचे राग त्याला गाता येतात. कीबोर्डवर २५०० गाणी तो वाजवतो. त्याला शिकवण्याच्या आणि अभिव्यक्त होण्याच्या धडपडीत चेतनच्या वडिलांना आणखी सात अंध मुले मिळाली. ही मुले शिक्षण घेणारी आहेत. कुणी अनाथ, तर कुणाच्या घरची परिस्थितीच हलाखीची आहे.
अमोल गोडघाटे या विद्यार्थ्यांने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. विकास गाडेकर बी.ए. प्रथम वर्षांत आहे. कैलास पानबुडे एम.ए.च्या प्रथम वर्षांत आहे. रुपाली फुलसावंगे बी.ए. द्वितीय वर्षांला आहे. तुळशीदास तिवारी एम.ए., तर संगीत भगत बारावीला आहे. प्रवीण कठाळे या तरुणाने संगीत विशारद केले आहे. २०११ पासून चेतनने त्याच्या प्रतिभेतून अर्थार्जन करायला सुरुवात केली. शास्त्रीय संगीत किंवा वाद्ये शिकत असताना वेगवेगळ्या टप्प्यावर ही सात भावंडे त्याला भेटली. या सर्वानी मिळून एक ऑर्केस्ट्रा स्थापन केला. चेतन कथाकथन, शास्त्रीय संगीत आणि वाद्य वाजवून महिन्याला बऱ्यापैकी मानधन मिळवतो. चेतनचे वडील शेतमजुरी करतात. आईही शेतमजुरी करायची, पण एवढय़ा मोठय़ा कुटुंबाला सांभाळणे आता त्यांना शक्य नाही.
आतापर्यंत ६० कुटुंबांना त्याने सौरकंदील खरेदी करून दिले आहेत. ७० अंध मुलांना रेडिओ आणि इतर उपकरणे, ३५ मुलांना पांढरी काठी दिली आहे. मदतीसाठी केवळ पैशापेक्षाही इच्छाशक्ती महत्त्वाची आहे, हेच या कुटुंबाच्या दानशूर वृत्तीतून दिसून येते.

* महत्त्वाचे म्हणजे, उचितकर यांच्याकडे चार-पाच वर्षांपूर्वी वीज नव्हती तेव्हा ते सौरकंदील आणायचे. ’शेतातील त्यांच्या घराच्या आजूबाजूला इतरही गरीब कुटुंबे आहेत.
* तेथे वीज नसल्याने चेतन स्वत:ला मिळणाऱ्या मोबदल्यातून सौरकंदील खरेदी करून या कुटुंबांना प्रकाश देतो.