News Flash

छत्रपती उड्डाण पूल इतिहासजमा होणार

आजपासून तोडण्याची प्रक्रिया सुरू; १५ दिवसांत मलबा हटविणार

छत्रपती उड्डाण पुलावर सुरू असलेली वाहतूक.  मंगळवारपासून पूल तोडणार असल्याने त्यावरील विद्युत खांब काढण्याचे काम सुरू झाले. 

आजपासून तोडण्याची प्रक्रिया सुरू; १५ दिवसांत मलबा हटविणार

नागपूरची ओळख असणाऱ्या वर्धा मार्गावरील बहुचर्चित छत्रपती चौकातील उड्डाण पूल त्याच्या निर्धारित कालावधीच्या तब्बल ३३ वर्षे आधी म्हणजे उद्या, मंगळवारी १५ नोव्हेंबरला मेट्रो रेल्वेच्या कामासाठी तोडण्यात येणार आहे. यामुळे नागपूरची एक ओळख तर पुसली जाणारच आहे, शिवाय या पुलासोबत त्या परिसरातील लोकांच्या जुळलेल्या भावनांनाही मूठमाती मिळणार आहे.

खापरी ते बर्डी या मार्गावर सध्या मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गात छत्रपती चौकाजवळील उड्डाण पूल अडथळा ठरला आहे. या जागेवर ‘डबल डेकर’ पूल बांधण्याचे नियोजन नागपूर मेट्रो रेल्वे प्रशासनाने केल्यावर व त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सहकार्य करण्याचे ठरविल्यावर उड्डाण पूल तोडण्यावर शिक्कामोर्तब झाले. अजनी चौक ते प्राईड या दरम्यान ३.२ किलोमीटरवर चार नवीन उड्डाण पूल होणार आहे. तो डबल डेकर असणार आहे.

शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांपैकी वर्धा मार्ग असून तो चोवीसही तास वर्दळीचा असतो. अशावेळी हा पूल तोडणे एक आव्हान आहे. मात्र, मेट्रो प्रशासनाने ते स्वीकारले असून पूल तोडणे आणि जमा झालेला सिमेंट काँक्रिटचा मलबा उचलून दूर नेणे ही सर्व कामे १५ दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले. यासाठी ३०० ते ५०० लोकांचे मनुष्यबळ लागणार आहे, असे या प्रोजेक्टचे मुख्य व्यवस्थापक के. सुशीलकुमार यांनी सांगितले. यासाठी वाहतुकीतही बदल करण्यात आला असून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने आराखडा तयार करण्यात आला आहे.

अशी वाहतूक वळविण्यात आली

वर्धा, चंद्रपूरकडून नागपूरकडे येणारी वाहने कोका कोला फॅक्ट्री चौकातून डावीकडे खामला बाजार चौकातून खामला चौक, सावरकरनगर चौक, देवनगर चौक, पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि नीरी मार्गाने वर्धा मार्गाने वळविण्यात आली आहे.

  • वध्रेकडून हिंगणा एमआयडीसीकडे जाणारी वाहतूक सावरकरनगर मार्गे रिंगरोडने वळविण्यात आली आहे.
  • शहरातून वध्रेकडे जाणारी वाहने साईबाबा मंदिराजवळील हिंदुस्थान कॉलनीतून डावीकडे गजानननगर, नरेंद्रनगर, नरेंद्रनगर उड्डाणपूल आणि कोका कोला फॅक्ट्री चौक यामार्गे वळविण्यात आली आहे.
  • कोका कोला फॅक्ट्री चौक, खामला चौक, सावरकरनगर चौक, अजनी चौक हा भाग ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आला आहे.
  • हिंदुस्थान कॉलनी आणि गजानननगर टी-पॉईंट ते नरेंद्रनगर उड्डाण पूल हे मार्गही ‘नो पार्किंग झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

पुलाविषयी थोडं

१९९५ ते १०९९ या काळात राज्यातील तत्कालीन युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून १९९८ मध्ये या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. छत्रपती चौकातील वाहतूक कोंडी कमी करणे हा प्रमुख उद्देश हा पूल बांधण्यामागे होता. सरासरी ४०० मीटर लांबीचा हा पूल असून त्याच्या बांधकामासाठी ५ कोटी १० लाख रुपये त्यावेळी खर्च झाले होते आणि त्याचे आयुष्यमान हे २०४९ पर्यंत होते. आता गडकरी केंद्रात मंत्री आहे. त्यांच्याच पुढाकाराने आता नागपुरात मेट्रो रेल्वेचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून त्यासाठी हा पूल तोडला जात आहे.

धुळीवर यंत्राद्वारे नियंत्रण

पूल तोडताना उडणारी धूळ परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखीचे कारण ठरण्याची शक्यता गृहीत धरून नागपूर मेट्रो रेल्वे प्रशासनाने यावर नियंत्रणासाठी एक विशेष यंत्राचा (डस्ट सेपरेटर) वापर करण्याचे ठरविले आहे. बांधकाम तोडताना उडणारी धूळ जमिनीवर बसावी म्हणून पाण्याचे फवारे या यंत्राद्वारे मारले जाईल. त्यामुळे धूळकण जमिनीवर पडतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

असा तुटणार पूल

मंगळवारपासून या पुलावरील विद्युत खांब काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर चोवीस तास आधी पुलाखालील चारही बाजूंची वाहतूक बंद केली जाईल. कॉम्बीक्रशर या यंत्राद्वारे पूल कापला जाईल व रॉक ब्रोकरद्वारे सिमेंटचे पिल्लरला छिद्र करून तो तोडण्यात येईल. एकूण पंधरा दिवसात हे काम पूर्ण केले जाईल. यातून ३ हजार क्युबिक मीटर सिमेंटचा, तर १६ हजार क्युबिक माती व इतर मलबा पूल तोडल्यानंतर निघणार असून तो ट्रकच्या माध्यमातून लगेचच इतरत्र हलविण्यात येणार आहे, या मलब्यावर पुनप्र्रकिया करून त्याचा पुन्हा वापर केला जाणार आहे, असे मेट्रो रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक शिरीष आपटे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पूल तोडण्याचे काम नागार्जून कंपनीला देण्यात आले असून ही कंपनी मते अ‍ॅण्ड असोसिएटच्या मदतीने ते पूर्ण करणार आहे. अशा प्रकारचे काम करण्याचा या कंपनीला पूर्वानुभव आहे.

छत्रपती उड्डाण पूल तोडण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. काही काळासाठी वाहतूक वळविण्यात आली आहे. लोकांना कमीत कमी त्रास व्हावा, असे नागपूर मेट्रो रेल्वे व्यवस्थापनाचे प्रयत्न आहेत, लोकांनी या कामाला सहकार्य करावे.  – शिरीष आपटे, उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क), नागपूर मेट्रो रेल्वे.

untitled-31

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 2:00 am

Web Title: chhatrapati flyover demolished order
Next Stories
1 ग्रामीण ‘आरटीओ’चाही ‘स्कूलबस’ चालकांना दणका!
2 काँग्रेसला घोटाळ्याचा आधार, जनमत तयार करण्यात मात्र अपयश
3 गुन्ह्य़ात दरवर्षी वाढ, कर्मचारी मात्र तेवढेच
Just Now!
X