महाराष्ट्रात केवळ चार नक्षलवादी ठार

‘मिशन २०१६’ या विशेष मोहिमेंतर्गत शेजारच्या छत्तीसगड पोलिसांनी बस्तरमध्ये गेल्या नऊ महिन्यांत तब्बल १०७ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रात याच काळात पोलीस केवळ चार नक्षलवाद्यांना ठार मारू शकले.

छत्तीसगडमधील बस्तर विभाग हा नक्षलवादी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच विभागात येणाऱ्या अबूजमाड परिसरात या चळवळीचा मुख्य तळ आहे. अलीकडच्या काही वर्षांत नक्षलवाद्यांनी सर्वाधिक हिंसाचार याच विभागात घडवून आणला आहे. या पाश्र्वभूमीवर बस्तर पोलिसांनी बजावलेली कामगिरी उल्लेखनीय ठरावी अशीच आहे. या विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक एस. पी. कल्लुरी यांच्या नेतृत्वात नक्षलवाद संपवण्यासाठी मिशन-२०१६ ही मोहीम सुरू करण्यात आली. अत्यंत आक्रमकपणे राबवण्यात आलेल्या या मोहिमेत गेल्या ९ महिन्यांत १०७ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. या सर्वाचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात मिळवले. पोलिसांसोबत होणाऱ्या चकमकीत ठार झालेल्या सहकाऱ्यांचे मृतदेह नक्षलवादी स्वत:बरोबर घेऊन जातात. या पाश्र्वभूमीवर बस्तर पोलिसांची कामगिरी उजवी ठरली आहे.

सर्वाधिक ३८ नक्षलवादी सुकमा जिल्ह्य़ात तर त्या खालोखाल २९ नक्षलवादी बिजापूर जिल्ह्य़ात ठार झाले. दंतेवाडात १२, बस्तरमध्ये ११, नारायणपूरला ९ तर कोंडेगाव जिल्ह्य़ात ६ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. सर्वात कमी २ नक्षलवादी कांकेर जिल्ह्य़ात मारले गेले. याच नऊ महिन्यांच्या काळात पोलिसांनी ठार मारलेल्या नक्षलवाद्यांकडून ३० बंदुका जप्त केल्या. पोलिसांच्या या कारवाईमुळे या विभागात या काळात नक्षल्यांकडून होणाऱ्या हिंसाचारात घट झाल्याचा दावा कल्लुरी यांनी केला. संपूर्ण देशात एक वर्षांच्या आत एवढय़ा मोठय़ा संख्येत नक्षलवादी मारले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्या तुलनेत नक्षलवादविरोधी मोहीम राबवणाऱ्या इतर राज्यांची कामगिरी फारशी प्रभावी ठरलेली नाही. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्य़ात याच काळात केवळ चार नक्षलवाद्यांना ठार मारण्यात पोलिसांना यश मिळाले. त्यापैकी तीन नक्षलवादी शेजारच्या तेलंगण राज्यातील ग्रेडाऊंड या विशेष दलाने महाराष्ट्राच्या हद्दीत येऊन मारले.

एके काळी नक्षलग्रस्त राज्यांमध्ये छत्तीसगडचे पोलीस दल सर्वात दुबळे म्हणून ओळखले जात होते. ही ओळख या कारवाईने पुसली असली तरी यातील अनेक चकमकी खोटय़ा होत्या व पोलिसांनी नक्षलच्या नावावर अनेक निरपराध तरुणांना ठार मारले, असे आरोप याच काळात झाले हे उल्लेखनीय आहे.