निम्न पैनगंगावरून मोघेंचा आंदोलनाचा इशारा
विरोधात असताना विदर्भातील सिंचन प्रकल्पांबद्दल पोटतिडिकीने बोलणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्हय़ासाठी वरदान ठरू शकणाऱ्या निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी गेल्या आठ महिन्यांत वेळ काढता आलेला नाही, अशी टीका माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली.
या प्रश्नाकडे हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधण्यात आले होते. त्या वेळी फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी वेगळी बैठक घेण्याचे मान्य केले होते. त्यानंतर निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बैठकीसाठी चारदा प्रस्ताव पाठवला, परंतु अद्याप मुख्यमंत्र्यांना सवड मिळालेली नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणात होत आहेत. या प्रकल्पाची सिंचन क्षमता प्रचंड मोठी आहे. प्रकल्पाशी संबंधित सर्व मान्यता प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा मोठा प्रकल्प असल्याचे सांगून गप्प बसले आहेत. सुमारे पावणेसहा लाख एकर जमिनीला सिंचनक्षम करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पासाठी सरकारने केवळ १२.५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यावरून सरकारची या प्रकल्पाबद्दलची कळकळ दिसून येते. प्रकल्पाचे काम सुरू झाले नसल्याने त्याला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा प्राप्त होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्र्यांना येथील लोकांबाबत थोडीशी जरी आपुलकी असेल तर ३१ मार्च २०१६ पूर्वी किमान २५ कोटी रुपयांची तरतूद करून या प्रकल्पाचे काम सुरू करावे. आम्ही जानेवारी २०१६ पर्यंत प्रतीक्षा करू. त्यानंतर मात्र आंदोलन पुकारू, असा इशाराही मोघे यांनी दिला.