नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री केलेले ‘फेसबुक लाइव्ह’ भाषण कशासाठी केले हे काही कळले नाही.  कारण त्यात ना कुठल्याही उपाययोजना होत्या ना कुठले निर्णय घेण्यासंदर्भातील सूचना, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. फडणवीस शनिवारी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राज्यात करोना वाढत असताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या उद्बोधनात कुठलेच दिलासादायक वृत्त नव्हते.  केवळ मुखपत्रातून विरोधकांवर टीका करुन किंवा फेसबुक लाइव्ह भाषण करुन करोना संपणार नाही. त्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. टाळेबंदी करताना नागरिकांना कशा पद्धतीने मदत केली जाईल हे सांगणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र  मोदींनी देशात टाळेबंदी केली तेव्हा प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली. त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या.  मात्र राज्य सरकारने पॅकेज न देता फक्त लोकांची वीज कापली लोकांना त्रास दिला अशी टीका फडणवीस यांनी केली.