मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रण देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने टळलेले मेट्रोच्या अ‍ॅक्वामार्गाचे (बर्डी ते लोकमान्य नगर) उद्घाटन नागपूर हिवाळी अधिवेशन काळात म्हणजे १८ ते २० डिसेंबरदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे.

दरम्यान, मेट्रो उभारणीत राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून उल्लेखनीय योगदान असणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याकडे सर्वाचे लक्ष असणार आहे. बर्डी ते लोकमान्य नगर मार्ग तसेच सुभाषनगर, बर्डी स्थानकाच्या उद्घाटनाला सात सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार होते. मात्र ६ सप्टेंबरला नागपुरात झालेल्या जोरदार पावसामुळे मोदी यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला.

तेव्हापासून या मार्गाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. या दरम्यान या मार्गावरील उर्वरित कामे तसेच बर्डी स्थानकाचे शिल्लक काम महामेट्रोने पूर्ण केले आहे. पंतप्रधानांच्याच हस्ते उद्घाटन व्हावे म्हणून प्रयत्नही झाले. मात्र आता १८ ते २० डिसेंबरदरम्यान  या मार्गाच्या उद्घाटनाचे नियोजन महामेट्रोने केले आहे. या काळात नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होऊ शकतो, मात्र अद्याप मुख्यमंत्र्यांच्या येण्याचे निश्चित झाले नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने राज्यातील राजकीय समूकरणे बदलल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्याची शक्यता कमी आहे.

मेट्रो सुरक्षा आयुक्तांकडून बर्डी स्थानकाची पाहणी

नागपूर दौऱ्यावर आलेले मेट्रोचे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी बर्डी मेट्रो स्थानकाची पाहणी केली.  यावेळी आगप्रतिबंधक उपकरणांचे प्रात्याक्षिकही करण्यात आले. या सर्व कामाबाबत गर्ग यांनी समाधान व्यक्त केल्याचे महामेट्रोकडून कळवण्यात आले. स्थानकावरील सरकते जिणे, नियंत्रण कक्षाची पाहणी केली. आणीबाणीच्या काळात प्रवाशांना स्थानकाबाहेर पडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे प्रात्याक्षिकही करण्यात आले. यावेळी महामेट्रोचे संचालक (प्रकल्प)महेश कुमार, कार्यकारी संचालक सुनील माथूर,  देवेंद्र रामटेककर, महाव्यवस्थापक अनिल कोकाटे उपस्थित होते.