महाराष्ट्रात सर्वाधिक कर्करुग्ण आढळणाऱ्या नागपुरात एकही बाल कर्करोगतज्ज्ञ नाही. मुलांवर सध्या पारंपरिक पद्धतीनुसार सामान्य कर्करोगतज्ज्ञ उपचार करत असून मेडिकलच्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे येणाऱ्या बाल कर्करुग्णांतील ७० ते ७५ टक्के जणांचा मृत्यू होतो. शासनाकडून विदर्भातील एकाही शासकीय संस्थेत बाल कर्करोगाशी संबंधित अभ्यासक्रम नसल्याने येथील बाल कर्करुग्णांच्या मृत्यूवर नियंत्रण मिळणार कसे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आधुनिक काळात भारतासह जगभरात वैद्यकीय संशोधनातून विविध आजारांच्या उपचाराच्या नवनवीन तंत्र व उपकरणांचा शोध लागत आहे. भारतातील दिल्ली, मुंबई, गुजरातसह अनेक भागात या तंत्राचा वापर करून रुग्णांना थेट उपचारातून त्याचा लाभही दिला जात आहे. लहान मुलांसह मोठय़ा वयोगटातील रुग्णांवर अचूक उपचार व्हावा म्हणून गेल्या काही वर्षांत नवनवीन अभ्यासक्रम देशातील मोठय़ा काही वैद्यकीय संस्थांमध्ये सुरूही झाले आहेत. येथे विविध आजारांवर बालरोगतज्ज्ञांसह इतर संवर्गातील तज्ज्ञ असे वर्गीकरण होत असल्याने या तज्ज्ञांना त्यांच्याच विषयात अद्ययावत ज्ञान मिळत आहे. निश्चितच त्यामुळे शिक्षण झाल्यावर या तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेगवेगळ्या भागात रुग्णांवर अचूक उपचार मिळण्यास मदत होत आहे.

भारतात मोठय़ा संख्येने वाढणाऱ्या कर्करोग या गंभीर आजारावरील उपचाराच्या बाबतीतही असेच घडत आहे. देशातील सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करुग्णांत नागपूर विभागाचा वरचा क्रमांक आहे, परंतु अद्याप येथे बाल कर्करोग तज्ज्ञांचा अभ्यासक्रम सोडा एकही विशेतज्ज्ञ डॉक्टर नाही. त्यामुळे या भागात मध्य भारतातील गंभीर स्वरूपातील येणाऱ्या बाल कर्करुग्णांवर सामान्य कर्करोगतज्ज्ञच उपचार करत आहे. मुंबई, दिल्ली, गुजरातसह काही भागात अनेक रुग्णांवर उपचार करणारे बाल कर्करोग तज्ज्ञ असताना या प्रकाराने विदर्भातील बाल कर्करुग्णांवर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांकडून बोलून दाखवली जात आहे. विदर्भात बाल कर्करोगतज्ज्ञ नसल्याने लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या कमी प्रमाणातील औषधांसह रेडिएशनमध्ये थोडय़ा चुका संभवतात, परंतु पर्यायच नसल्याने हा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. ‘मेडिकल’मध्ये किडकॅन या संस्थेने बाल कर्करुग्णांवर केलेल्या अभ्यासानुसार येथे ३६० लहान मुलांना कर्करोग असल्याच्या नोंदी झाल्या. त्यात रक्ताचा कर्करोग असलेले ३९.७ टक्के, लिम्फोमाचे १२ टक्के, मेंदूचा ११.४ टक्के, हाडाचा ७.६ टक्के, मांसपेशीचा ४.४ टक्के, गुर्दा किडनीचे ३.५ टक्के, डोळ्याचा कर्करोग असलेल्या २.५ टक्के मुलांचा समावेश आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार, वेळीच निदान होऊन उपचार झाल्यास ७० ते ८० टक्के बाल कर्करुग्ण बरे होऊ शकतात, परंतु नागपुरात ७० टक्के मुलांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तेव्हा वाढीव मृत्यूकरिता येथे बाल कर्करोगतज्ज्ञांचा अभाव हे कारण जबाबदार आहे काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वैद्यकीय हब होणार कसा?

नागपुरात मेडिकल व मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसह काही खासगी वैद्यकीय महाविद्यलयांचे जाळे आहे. येथे अनेक लहान-मोठे खासगी व धर्मादाय संस्थांचे अद्ययावत रुग्णालये असून येथे विदर्भासह मध्य भारतातील मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेशच्याही हजारो गंभीर गटातील रुग्णांवर उपचार होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे वैद्यकीय हब करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वेळोवेळी सांगितले, परंतु शहरात साध्या बाल कर्करोग तज्ज्ञांशी संबंधित एमडी व डिप्लोमा अभ्यासक्रमही नसल्याने हे स्वप्न साकार कधी होणार? हा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत.

लवकरच अभ्यासक्रम

उपराजधानीत बाल कर्करोगतज्ज्ञ तयार होण्याकरिता नवीन अभ्यासक्रम सुरू होण्याची गरज आहे. सध्या सर्वसामान्य कर्करोग तज्ज्ञांकडून या मुलांवर उपचार होतात. या डॉक्टरांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या दरम्यान मुलांवरही उपचाराचे प्रशिक्षण दिले जात असल्याने त्यातही चुका होण्याची शक्यता कमीच असते. नागपूरला होऊ घातलेल्या राष्ट्रीय कर्करोग संस्थेत पुढच्या वर्षी लहान मुलांवरील कर्करोगाशी संबंधित निश्चितच अभ्यासक्रम सुरू होतील. त्याचा लाभ येथील रुग्णांना होईल.

डॉ. आनंद पाठक, संचालक, राष्ट्रीय कर्करोग संस्था, नागपूर