News Flash

शौचखड्डय़ात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

कंत्राटदाराने परिसरात सुरक्षा भिंत न बांधता केवळ ताराचे तात्पुरते कुंपण उभारले.

विकासकामे जीवघेणी

नागपूर : शहरातील विकासकामे करताना पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने ही कामे लोकांच्या जीवावर उठली आहेत. याचा प्रत्यय आज मंगळवारी वाडी पोलीस ठाण्यांतर्गत दवलामेटी परिसरात आला. गावातील लोकांसाठी बांधण्यात येणाऱ्या समाज भवनाच्या शौचखड्डय़ात बुडून एका साडेचार वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

आर्यन नवदीप राऊत रा. दवलामेटी असे मृत मुलाचे नाव आहे. उपराजधानीसह जिल्ह्य़ात मोठय़ा प्रमाणात विकासकामे करण्यात येत आहेत. ही विकास कामे करताना नागरी सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. पण, कंत्राटदार अतिशय बेजबाबदारपणे कामे करीत आहेत. दवलामेटी परिसरात समाज भवनाचे बांधकाम करण्यात येत आहे. या भवनाकरिता राज्याच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून निधी मंजूर झाला असून बांधकाम ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहे. समाजभवनाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. पण, समाजभवनाच्या परिसरात शौचालय निर्माण करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची मागणी होती. या मागणीची दखल घेऊन शौचालयासाठी दहा फूट खोल शौचखड्डा खोदण्यात आला. पाऊस सुरू झाल्याने बांधकाम बंद करून खड्डा मोकळाच सोडून दिला. त्यात पावसाचे पाणी साचले. सोमवारी सायंकाळी आर्यन हा खेळण्यासाठी घराबाहेर पडला. रात्री उशिराही तो न परतल्याने आईवडील त्याचा शोध घेत होते. आर्यन कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून घेतली.

समाजभवनाला ताराचे तात्पुरते कुंपण

समाजभवनाचे बांधकाम करीत असताना कंत्राटदाराने परिसरात सुरक्षा भिंत न बांधता केवळ ताराचे तात्पुरते कुंपण उभारले. त्यामुळे लहान मुले मोकळ्या जागेत खेळण्यासाठी कुंपणाखालून आत शिरतात. शिवाय शौच खड्डा खोदला, पण अंधारात त्या ठिकाणी खड्डा असल्याचे लक्षात येईल, असे कोणतेही चिन्ह लावण्यात आले नव्हते. त्यामुळे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

विकासकामे आणि अपघात

शहराच्या विकासात भर घालणाऱ्या मेट्रोच्या कामांमुळे अनेक अपघात झाले असून त्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. २१ ऑक्टोबर २०१७ ला सीए मार्गावर मेट्रोमुळे दोन महिला आणि एक चिमुकल्या मुलाचा गंभीर अपघात झाला होता. त्या प्रकरणात मेट्रोने दोन अभियंत्यांना निलंबित केले होते. त्यानंतर सीताबर्डीतील मेट्रोच्या पिलरचा लोखंडी सापळा कोसळला होता. काँग्रेसनगर परिसरात मेट्रोच्या कामामुळे अरुंद असलेल्या रस्त्यावर सिमेंट मिक्सरच्या खाली सापडून एका तरुणाचा मृत्यू झाला तर ३० मार्च २०१८ ला मेट्रोचे काम करणाऱ्या  क्रेनमुळे अभियंत्याचा मृत्यू झाला. १८ एप्रिल २०१८ ला मेट्रोलच्या ट्रेलरखाली येऊन वैभव गडेकर या मेट्रोच्या कर्मचाऱ्याचाच मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 4:06 am

Web Title: child death after drowning in toilet large hole zws 70
Next Stories
1 उघडय़ा गटारांमुळे नागपूरकरांचा जीव धोक्यात
2 सुपरस्पेशालिटी, डागा, मनोरुग्णालयात उपाहारगृह नाही
3 जुगार अड्डा चालवणाऱ्याचा खून
Just Now!
X