नागपूर : एका १४ वर्षीय मुलीचा २१ जुलैला होणारा विवाह सोहळा चाईल्ड लाईन, महिला व बाल कल्याण विभाग आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोखला असून मुलीच्या आईवडिलांची समजूत काढली. शिवाय १८ वष्रे पूर्ण होण्यापूर्वीच तिचा विवाह झाल्यास बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा इशारा आई-वडिलांना देण्यात आला.

पीडित मुलगी शिकत नाही. तिचे आईवडील मजुरी करतात. मुलगी म्हणजे डोक्यावरील ओझे समजून आई-वडिलांनी लवकरात लवकर विवाह करण्याचा निर्णय घेतला. परिचयातील एका मजूर तरुणाशी तिचा विवाह करून देण्याचे ठरवले. २१ जुलैला विवाहाचा मुहूर्त होता. नातेवाईकांमध्ये निमंत्रण पत्रिकांचेही वाटप करण्यात आले. दरम्यान, या विवाहाची माहिती चाईल्ड लाईनला मिळाली. मुलगी ही १८ वर्षांपेक्षा कमी वयाची असल्याचे समजले. याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांना देण्यात आली. त्यानंतर जुनी कामठी पोलीस, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईनच्या पथकाने मुलीच्या घरी गुरुवारी भेट दिली. माहिती जाणून घेतली असता दस्तावेजावरून मुलीचे वय १४ वष्रे असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, अनुप देशमुख, चाईल्ड लाईन समन्वयक छाया गुरव, सारिका बारापात्रे, पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे, पंकज भारसिंगे, तंगराजन पिल्ले, अंगणवाडी सेविका स्मृती दहाट यांनी मुलीच्या आई-वडिलांचे समुपदेशन केले. १८ वष्रे वय पूर्ण होण्यापूर्वी तिचा विवाह करू नये. तिचा विवाह करण्यात आल्यास आई-वडिलांसह नवरा व इतर नातेवाईकांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. तिच्या आई-वडिलांनीही बालवयात लग्न न करण्याचे हमीपत्र प्रशासनाला लिहून दिले.