मंगेश राऊत

आईवडील व कुटुंबापासून दूर राहणारी मुले मोठय़ा प्रमाणात वाममार्गाला लागत असल्याची चर्चा नेहमी होत असते. परंतु, राज्यातील बाल गुन्हेगारीचा अभ्यास केल्यास आईवडील व कुटुंबासोबत राहणारी  मुलेच गुन्हेगारीसारख्या वाईट गोष्टीकडे जास्त आकर्षित होत असल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून महाराष्ट्रात बाल गुन्हेगारांकडून घडलेल्या गुन्ह्य़ाचा अभ्यास केल्यावर ही बाब प्रकर्षांने समोर आली.

बाल गुन्हेगारांकडून घडलेले गुन्हे व त्यातील आरोपींचा अभ्यास केल्यास सर्वाधिक बाल गुन्हेगार हे आईवडील व कुटुंबासह राहात असतानाच गुन्हे करीत असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे, बेघर व निराधार मुलांकडून घडलेल्या गुन्ह्य़ांचे प्रमाण यात खूप नगण्य आहे.

२०१९ मध्ये १८ वर्षांखालील बाल गुन्हेगारांकडून राज्यात ५ हजार १८९ गुन्हे घडले. या गुन्ह्य़ांमध्ये ६ हजार ४५४ बाल गुन्हेगार आरोपी आहेत. त्यापैकी ५ हजार ८३४ बालगुन्हेगार आपल्या आईवडिलांसह तर ४१६ बालगुन्हेगार पालक असलेल्या नातेवाईकांकडे राहत होते. यातील केवळ २०४ बेघर व निराधार मुले अशी आहेत, ज्यांच्याकडून गुन्हे घडलेले आहेत. बालगुन्हेगारीचे हे बदललेले चित्र बघून समाजाने आता आपली मानसिकता बदलून आपल्या मुलांकडेच जास्त लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

महानगरांमध्येही सारखीच स्थिती

२०१९ मध्ये मुंबईत आईवडिलांसह राहणारे ६३६, पालकांसोबत ४५ आणि बेघर असलेल्या ७५ मुलांनी गुन्हे केले. नागपुरात आईवडिलांसह राहणारे ३७६ तर पालकांसोबत राहणाऱ्या ८६ मुलांचा गुन्ह्य़ात सहभाग होता. नागपुरात २०१९ मध्ये बेघर, निराधार मुलांकडून एकही गुन्हा घडलेला नाही. पुणे शहरात बालगुन्हेगारी अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्य़ांतील ४०६ विधिसंघर्षग्रस्त बालक आपले आईवडील आणि ८ मुले पालकांसोबत राहायची. विविध गुन्ह्य़ांतील २४ मुले बेघर होती.