हस्तशिल्पकारांच्या वस्तूंना उठावच नाही; राष्ट्रीय सन्मान प्राप्त कलाकारांची खंत
देशभरातील विविध राज्यातील हस्तशिल्पकार अतिशय मेहनतीने वेगवेगळ्या वस्तूंची निर्मिती करीत असताना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील हस्तकला प्रदर्शनात मात्र ‘मशीन मेड’ किंवा ‘ऑफसेट’च्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य दिले जात असल्यामुळे मूळ हस्तशिल्पकारांवर अन्याय होत असल्याची खंत विविध राज्यातून आलेल्या राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील कारागिरांनी व्यक्त केली.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात सुरू असलेल्या ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाव्यामध्ये देशभरातील विविध राज्यातील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कलावंतांना आमंत्रित करण्यात येऊन त्यांच्या कलाकृतींचे दालन लावण्यात आले आहे. त्याचबरोबर काही चिनी बनावटीच्या वस्तूही विक्रीला आहेत. देशभरातील हस्त्शिल्पकारांना व्यासपीठ मिळून त्यांच्या मेहनतीचे पैसे मिळावे आणि त्यांच्या कलांचा सन्मान व्हावा हा उद्देश ठेवून केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या शासकीय संस्था मेळावे आयोजित करीत असतात. त्यात चिनी बनावटीच्या वस्तूंना प्राधान्य देऊ नये, अशी मागणी कलावंतानी केली. या मेळाव्यात पंजाबचे सत्यनारायण पटियाला, उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरातील जहिरुद्दीन, राजस्थानमधील जयपूरचे सुनील मारु, गुजरातचे देवजी प्रेमजी वानकर, वाराणसीचे रियाजुद्दीन अन्सारी, पंढरी मारोती कुंभारे, बाबुलाल पटेल, उत्तर प्रदेशचे रिझवान खातून, काश्मीर श्रीनगरचे मुश्ताक अहमद खान, उत्तर प्रदेशचे घाशीराम यादव, वाराणसीचे अनवर अहमद, रायपूरचे देवदत्त डे, हबीब अन्जुम, दिल्लीचे सुरिंदर कुमार, खुर्शीद उंझमान खान सजित अहमद आदी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलावंत सहभागी झाले आहेत.
यावेळी सुनीष मारु यांच्याशी संवाद साधला असताना, राज्यस्थानमध्ये छोटय़ा रंगबेरंगी आकर्षक दगडाचा उपयोग करून आगळेवेगळे पेंटिंग तयार केले आहे. या पेटिंगमध्ये लागणारी मेहनत बघता त्याला किंमत मिळत नाही. चिनी बनावटीच्या वस्तूंची मात्र भरपूर विक्री होते आणि त्याचे भावही कमी असतात. रेडिमेट वस्तू स्वस्त असल्यामुळे त्या घेण्याकडे ग्राहकांचा कल जास्त असतो मात्र हाताने तयार केलेल्या वस्तूंना पाहिजे त्या प्रमाणात किंमत मिळत नाही.
केंद्राच्या परिसरात लावण्यात आलेली काही दालने ही चिनी वस्तूंची असून त्यांना परवानागी देण्यात आली आहे. केंद्राचा उद्देश चांगला असला तरी हस्तशिल्पाकारांवर मात्र अन्याय होतो आहे. हस्तशिल्प मेळाव्याच्या नियमावलीत रेडिमेट वस्तू असलेल्या स्टॉलला परवानगी देऊ नये, अशी अट टाकली जात असताना नियमाचे उल्लंघन केले जात आहे. बाजारात मोठय़ा प्रमाणात चिनी बनावटीच्या वस्तू विक्रीला आल्या असताना त्यावर बंदी घातली जात नाही मात्र आपल्याकडील वस्तूू बाहेरच्या देशात पाठवायच्या असेल तर मात्र कडक नियमावली करण्यात आली आहे. हा भारतातील हस्तशिल्पकारांवर एकप्रकारे अन्याय असल्याची प्रतिक्रिया अनेक पुरस्कार प्राप्त कलावंतांनी व्यक्त केली.
गेल्या ३० वर्षांपासून स्टोन पेंटिंग तयार करणारे सुनीष मारु यांना माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम आणि त्यापूर्वी प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
बिहारचे नवीन कुमार झा यांचे मधुबनी पेंटिंगचे दालन आहे. ब्रासपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू त्यांनी प्रदर्शनात ठेवल्या आहेत. या वस्तू तयार करताना कारागिरांना प्रचंड मेहनत करावी लागत असताना त्याबदल्यात त्याची किंमत मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. इस्लाम अहमद यांची लाखापासून तयार करण्यात आलेल्या बांगडय़ा आणि सौंदयप्रसाधनात भर घालणारे साहित्य विक्रीला आहे. लाखेची निर्मिती आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात होत असली तरी त्यापासून बनवलेल्या वस्तूंची निर्यात मात्र होत नाही. लाखेपासून तयार करण्यात आलेल्या बांगडय़ाची वेगळी खासियत असून त्याला जगात मान्यता मिळाली आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्या उपयोगाच्या आहे.
लाखेपासून बांगडय़ा आणि इतर आकर्षक अशा वस्तूंची निर्मिती करणाऱ्या अहमद यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ओरिसाचे रामचंद्र साहू यांच्यासह अनेक लोककलावंतांनी कलाकुसरीच्या वस्तूंची निर्मिती केली आहे.