News Flash

विदर्भातील शहरे जगात सर्वाधिक उष्ण 

देशात ज्या भागांत उच्च तापमानाचे जास्त दिवस आहेत, तेथे सरासरी कमाल तापमानसुद्धा स्थिरावल्याचे या संशोधकांनी सिद्ध केले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

हवामान खात्याच्या संशोधनातील निष्कर्ष

विदर्भातील शहरे जगातील सर्वाधिक तापमानाची आणि तापमानाचा मुक्काम अधिकाधिक दिवस राहणारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय हवामान खात्याने देशभरातील १७६ वेधशाळांच्या १९६९ वर्षांपासून आजपर्यंतच्या तापमानाच्या आकडेवारीच्या आधारावर हा निष्कर्ष काढला आहे.

पुणे आणि दिल्लीतील भारतीय हवामान खात्याच्या मुख्य वेधशाळेतील शास्त्रज्ञ ए. के. जयस्वाल, पीसीएस राव आणि वीरेंद्र सिंग यांनी हे संशोधन केले आहे.

हवामान खात्यातील संशोधकांनी एखाद्या ठिकाणचे मार्च ते जून दरम्यानचे तापमान ३७ अंशापेक्षा अधिक असेल तर त्या दिवसाची नोंद उच्च तापमानाचा दिवस अशी केली आहे. भारतातील १७६ वेधशाळांमधून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारावर ही उच्च तापमानाची शहरे कोणती, त्याचा शोध घेण्यात आला. गेल्या ५० वर्षांतील आकडेवारीनुसार उच्च तापमानाची सर्वाधिक शहरे देशाच्या दक्षिण आणि मध्य भागात आहेत. उत्तर भारताच्या तुलनेत मध्य आणि दक्षिण भारतातील शहरांमधील तापमान आणि उच्च तापमान असणाऱ्या दिवसांची संख्या तेथे अधिक आहे.

राजस्थानच्या वाळवंटातील बाडमेर शहरात ४९.९ अंश सेल्सिअस आणि श्रीगंगानगरमध्ये ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मात्र येथे ६९ दिवसच उच्च तापमान राहते. त्यावरून विदर्भ आणि मध्य भारतातील इतर ठिकाणी या शहरांतील तापमान कसे तापदायक बनत चालले आहे, याचा अंदाज येतो. राजस्थानातील बारमेर शहरात उच्च तापमान असणारे दिवस ८८ आहेत. त्या तुलनेत जळगावला ९६, तर चंद्रपूरला ९२ दिवस उच्च तापमान राहते.

देशात ज्या भागांत उच्च तापमानाचे जास्त दिवस आहेत, तेथे सरासरी कमाल तापमानसुद्धा स्थिरावल्याचे या संशोधकांनी सिद्ध केले आहे. उच्च तापमानाचे दिवस उत्तर भारतात तीन टक्क्यांनी, पश्चिम भारतात पाच टक्क्यांनी, पूर्व भारतात नऊ टक्क्यांनी, तर मध्य आणि दक्षिण भारतात ते १८ टक्क्यांनी वाढले आहेत. या दिवसाची संख्या आणखी वाढत जाईल, असा अंदाज आहे.

चंद्रपूर उच्च तापमानाचा केंद्रबिंदू

१९६९ पासून आजपर्यंतच्या कमाल तापमानाचे आकडे तपासले तर संपूर्ण भारतात कमाल तापमानाची दोन केंद्रे तयार झाली आहेत.  पहिले केंद्र राजस्थानमध्ये जैसलमेर-बिकानेर आणि दुसरे महाराष्ट्रात चंद्रपूर येथे आहे. पहिल्या केंद्राचे तापमान ३९ अंश सेल्सिअस आणि दुसऱ्या चंद्रपूर केंद्राचे तापमान ४० अंश सेल्सिअस इतके आहे.  चंद्रपूरवर असलेला कमाल तापमानाचा केंद्रबिंदू सर्वाधिक आहे. त्यामुळे चंद्रपूर भारतातील किंबहुना जगातील उच्च तापमानाचा केंद्रबिंदू होण्यामागे कोणती कारणे असू शकतील याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे प्रा. योगेश दुधपचारे यांनी सांगितले.

एकीकडे भौगोलिक घटक आणि दुसरीकडे चंद्रपूरला मोठय़ा प्रमाणात असलेले कारखाने, प्रदूषण, कोळसा खाणी या गोष्टी त्याच्या उच्च तापमानास आणि तापमान कालावधीस किती कारणीभूत आहेत, यावर संशोधन होणे आवश्यक आहे.

– प्रा. योगेश दुधपचारे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 1:45 am

Web Title: cities of vidarbha are the hottest places in the world
Next Stories
1 प्रेयसीचा हट्ट पुरविण्यासाठी त्यानं चोरलं चक्क मांजर
2 कडक उन्हामुळे शहरात अघोषित संचारबंदी
3 कठोर कायद्यामुळे आता कुणालाही करचुकवेगिरी करणे अशक्य
Just Now!
X