वाढलेल्या झुडपांमध्ये साप, विंचूचा डेरा; झोपाळे तुटले, घसरगुंडी मोडली, प्रसाधनगृहात घाण

रोजच्या दगदगीतून वेळ काढून चार निवांत व प्रसन्न क्षण घालवण्यासाठी अनेक जण उद्यानाची वाट धरतात. फुलांचा दरवळ, गार वारा व मन एकाग्र होईल अशी निरव शांतता येथे लाभावी, अशी त्यांची अपेक्षा असते, परंतु उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच घाणीचा तीव्र दर्प नाकात शिरत असेल, गुडघ्याएवढय़ा वाढलेल्या गवतात साप, विंचू फिरत असतील आणि तुटलेली बाके शरीराला इजा पोहोचवत असतील तर कोण या उद्यानांमध्ये पाय ठेवेल?  शहरातील उद्यानांची सध्याची स्थिती अशीच आहे.

विशेष म्हणजे, महापालिका व नागपूर सुधार प्रन्यास या उद्यानांच्या देखरेखीवर लाखोंचा खर्च करीत असतानाही उद्याने दिवसागणिक बकाल होत आहेत. अनेक उद्यानांत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पक्की किंवा तात्पुरती प्रसाधनगृहे, सूचना फलक, कारंजे, तक्रार नोंदवही, देखभालीसाठी माळ्याचे निवासस्थान, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी झोपाळे, घसरगुंडी इत्यादी खेळणी, बाके नाहीत. प्रन्यासच्या २५ उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तर ३४ उद्यानांत प्रसाधनगृहे नाहीत. तसेच २८ ठिकाणी सूचना फलक नाहीत. शहरात महापालिकेची ९५ तर नागपूर सुधार प्रन्यासची ५८ उद्याने आहेत. महापालिकेच्या केवळ २४ उद्यानांत स्वच्छता गृहाची व्यवस्था आहे. साधारणत: प्रत्येक झोनमध्ये १० ते १२ छोटी-मोठी उद्याने आहेत आणि त्यातील अनेक उद्याने खासगी कंत्राटदारांकडे सोपवण्यात आली आहेत. त्यामुळे स्वच्छतेची आणि रखवालीची जबाबदारी कंत्राटदाराकडे आहे. मात्र, कंत्राटदार स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. स्वच्छतागृहे दररोज स्वच्छ करणे आवश्यक असले तरी ती आठवडय़ातून एकदाच स्वच्छ केली जातात. पूर्व नागपुरातील लता मंगेशकर, डॉ. बाबासाहेब उद्यान, देशपांडे लेआऊटमधील उद्याने ही त्या भागातील मोठी उद्याने आहेत. मात्र, येथील स्वच्छतागृहाची अवस्था फारच गंभीर आहे. अशीच स्थिती दक्षिण नागपुरातील उद्यानाची आहे. त्रिशताब्दी उद्यान आणि शेजारच्या  नेहरूनगर झोनला लागून असलेल्या उद्यानातील स्वच्छतागृहातही पाय ठेवायची इच्छा होत नाही. स्वच्छतागृह आहे तर त्यात पाणी नाही आणि पाणी आहे तर  साधने नाहीत अशी उद्यानाची स्थिती आहे.

निवेदनांची दखलच नाही

टेलिकॉमनगरातील उद्यानात महिलांसाठी स्वच्छतागृह असावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मीनगर झोनमध्ये निवेदन दिले. पण, त्याची दखल घेतली जात नाही. टेलिकॉमनगरातील अनेक लोक उद्यानात सकाळ-सायंकाळ येतात. मात्र, त्यांना बाहेरच्या सार्वजानिक स्वच्छतागृहात जावे लागते. दक्षिण पश्चिम भागातील अनेक उद्यानातील स्वच्छतागृहे इतकी घाणेरडी असतात की तेथे जाण्याची इच्छा होत नाही.

– कृ.द. दाभोळकर, ज्येष्ठ नागरिक

स्वच्छतागृहांची माहिती घेतोय

उद्यानातील स्वच्छतागृहाची जबाबदारी आरोग्य विभागाकडे असली तरी अनेक उद्याने खासगी कंत्राटदारांकडे सोपवली आहेत.  उद्यानातील स्वच्छतागृहाची स्थिती कशी आहे, याची माहिती उद्यान विभाग आणि आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

– रोहिदास राठोड, स्वच्छता अधीक्षक, महापालिका