अजित पवार यांची टीका

नागपुरात वाढलेल्या गुन्हेगारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. शहरात घडणाऱ्या  गुन्हेगारी घटनांमुळे संपूर्ण नागपूर दहशतीत असून वातावरण अस्वस्थ आहे, अशी टीका पवार यांनी केली.

पवार यांनी नागपूरच्या गुन्हेगारीवर चर्चा करण्यासाठी स्थगन प्रस्ताव दिला होता. अध्यक्षांनी तो नाकारला, पण त्यावर त्यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी पवार यांनी गृहखात्यावर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. नागपुरातील फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील नगरसेविकेचे पती आणि मुख्यमंत्र्यांशी जवळीक असलेले मुन्ना यादव गेल्या महिनाभरापासून पोलिसांना सापडत नाहीत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले फडणवीस हे मुन्ना यादव यांना जेरबंद करून कायद्याचे राज्य असल्याचे दाखवून देण्याऐवजी आधीच्या सरकारमध्ये कोण-कोण फरार होते. याची जंत्री माझ्याकडे आहे. हे सांगण्यात धन्यता मानत आहेत. आता अधिवेशन सुरू असताना खापरखेडय़ात एका बारमध्ये गोळीबार झाला. सर्वसामान्य जनता भयभित आहे. राज्याचे प्रमुख ज्या शहराचे प्रतिनिधित्व करतात त्या शहरात खून, दरोडे, चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.

खापरखेडय़ात युवकावर गोळ्या झाडण्यात आल्या. अशा प्रकारे या शहरात केव्हा काय होईल, याचा नेम राहिलेला नाही. शहराचे वातारण अस्वस्थ आहे. पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक राहिलेला नाही. शहरातील गुन्हेगारीने डोके वर काढले असून मुख्यमंत्र्यांना त्यावर नियंत्रण मिळण्यात अपयश आले आहे. शहरात कधी कुणाचे जीव जाईल. याची शाश्वती राहिलेली नाही, असे पवार म्हणाले.

व्यापारी, महिला, तरुणी दहशतीत जीवन जगत आहेत. गुन्ह्य़ांमुळे शहरात अवस्थेतेचे वातावरण आहे. हे पोलीस दलाचे आणि सरकारचे अपयश आहे. यामुळे सर्व विषय बाजूला ठेवून कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करावी, अशी टीका अजित पवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून दिली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नागपूर शहरात गुन्हे कमी झाले असून त्यासंदर्भात मुख्यमंत्री चर्चा करतील. याआधी गुन्हे घडत होते, असे सांगितले. देशात गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्रातील तीन शहर आहेत. त्यामध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुन्या सरकारचे दाखले देऊन किती दिवस वेळ मारून नेणार, असा सवालही पवार यांनी केला. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन प्रस्ताव फेटाळला.