श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांचे मत,  लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

नागपूर : जगात सर्वत्र करोना विषाणूंशी युद्ध सुरू आहे.  हे युद्ध जिंकण्यासाठी प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने नियम पाळणे गरजेचे आहे. वृद्धांसह इतर आजार असलेल्यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवावे. सगळ्यांनी स्वत:चे कर्तव्य पाळल्यास हा आजार नियंत्रणात आणता येतो, असे मत विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त के ले. लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली असता ते बोलत होते.

डॉ. अरबट म्हणाले, चीनच्या वुहानमधून डिसेंबरमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. या शहरातील प्रत्येकाचे विलगीकरण करण्यापूर्वी तेथील लक्षावधी नागरिकांनी देश-विदेशातील विविध ठिकाणी भेट दिली. त्याने हा संसर्ग  जगातील १७० देशांत पसरला. प्राथमिक निरीक्षणात हा विषाणू वटवाघूळपासून इतर प्राण्यांत व त्यातून मानवात आल्याचे बोलले जाते. भारतात या विषाणूने सुमारे १७० हून अधिक लोक ग्रस्त आहेत. त्यापैकी ४ रुग्ण नागपुरातील आहेत.

करोना रुग्णाचा मृत्यूदर कमी असला तरी चक्राकार पद्धतीने हा आजार संक्रमित होण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. हा आजार टाळण्यासाठी शिंकणे, सर्दी, तापाच्या रुग्णापासून दूर राहून लक्षणे असलेल्यांना विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे.  इतरांनी या विषाणूची लागण होऊ नये म्हणून नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावे किं वा सेनिटायझरने स्वच्छ करावे. लक्षणे असलेल्या प्रत्येक रुग्णासह त्याच्या जवळच्या व्यक्तीने मास्क लावून संबंधिताशी विशिष्ट अंतरावर राहून बोलावे. गरज नसतांना  बाहेर जाऊ नये. वृद्ध, हृदय, मेंदू, मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी राहत असल्याने त्यांनी घराबाहेर शक्यतो पडूच नये. करोनाची बाधा झालेल्यांनी घरातील सदस्यांपासून वेगळे रहावे. श्वसनासह निमोनियाचा त्रास असलेल्या ६ टक्के व्यक्तींना रुग्णालयात दाखल करून उपचार द्यावे लागतात. चीनमध्ये या आजाराचा मृत्यूदर ३ टक्के तर इटलीमध्ये ७ ते ८ टक्के आहे.  करोनाच्या एकू ण मृत्यूत ७० टक्के व्यक्ती वयाची साठी ओलांडलेले  असल्याचेही डॉ. अरबट यांनी सांगितले.

समाजमाध्यमांपासून लांब रहा

हल्ली व्हॉट्सअ‍ॅप, फे सबुकसह विविध समाजमाध्यमांवर चिकन मटण खाल्ल्याने करोना होतो. गोमूत्र, लसूनसह विविध वस्तू खाल्याने करोना होत नाही, अशा बऱ्याच चुकीच्या पोस्ट सर्सास फिरत आहेत.  या पोस्टवर कु णीही विश्वास करू नये. शक्यतो या काळात समाजमाध्यमांपासून गरज नसल्यास लांब रहा, असा सल्लाही डॉ. अरबट यांनी दिला.

मानसिक स्थिती सांभाळण्याची गरज

प्रत्येक संशयित व्यक्तींसह जास्त जोखमीच्या व्यक्तींचे विलगीकरण आवश्यक आहे. वृद्ध व्यक्ती  जास्त भावनिक असतात. विलगीकरणाने ते नैराश्यात जाऊ शकतात. या ताण-तणावात त्यांची रोग प्रतिकारशक्तीही कमी होते. त्यामुळे ते विलगीकरणात असताना मनोरंजनासाठी टीव्ही बघणे, कॅ रम खेळणे गरजेचे आहे. या कठीण काळात सगळ्यांनी मानसिक स्थिती सांभाळणे गरजेचे असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास मानसिक आजार बळावण्याची शक्यता असल्याचेही डॉ. अशोक अरबट म्हणाले.

देश करोनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठय़ावर

पहिल्या टप्प्यात विदेशातून परतलेल्यांनाच या विषाणूची बाधा झाली. दुसऱ्या टप्प्यात या व्यक्तींच्या संपर्का तील काहींना हा आजार झाला. सध्या तातडीने त्यांना विलगीकरण करून त्यांची तपासणी सुरू आहे. या गटाकडून हे विषाणू समाजाच्या इतर घटकात पोहचल्यास व त्यांचा पत्ता काढणे अशक्य असल्यास या आजारावर नियंत्रण कठीण होईल. आपण सध्या या आजाराच्या तिसऱ्या टप्प्यावर असलो तरी प्रत्येकाने तातडीने शासनाला या आजारावर प्रतिबंधासाठी मदत करून दुसऱ्या पायरीवरच त्यावर आळा घालणे आवश्यक असल्याचे डॉ. अरबट यांनी सांगितले.

डॉक्टरांवर विश्वास ठेवा

करोनाचे नावही ऐकू नच सर्वाना धडकी भरते. परंतु या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपासून स्वच्छता करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच आपले कर्तव्य बजावत आहेत. या भागात सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचारी, व्यवस्थापनेत सुधारणा करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांसह या व्यवस्थापनाशी जुडलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडूनही या आजारावर नियंत्रणासाठी खूप मेहनत घेतली जात आहे. या सगळ्यांनाही कु टुंब आहे. अशा स्थितीत संपूर्ण समाजाने या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचेही डॉ. अरबट म्हणाले.

प्रसिद्धीमाध्यमांनी नैतिकता पाळावी

करोनाचे वृत्तांकन करताना प्रसिद्धीमाध्यमांनीही समाजात भीती निर्माण होणार नाही, चुकीची माहिती पुढे येणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. या विषाणूने बाधित व उपचार सुरू असलेल्या रुग्णासह त्याच्या कु टुंबीयांची ओळख जाहीर होऊ नये. या रुग्णाला उपचारादरम्यान कोणताही त्रास होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याची गरज आहे.