21 March 2019

News Flash

इटारसी ते नागपूर.. मातीच्या सुरईचा प्रवास थांबला

सुरईचा इटारसी ते नागपूर हा प्रवास आता थांबलेला आहे.

मातीचे थर्मास

कोलकात्यातील थर्मासला मागणी

तंत्रज्ञानाच्या युगात थंड पाण्यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर होत असला तरी मातीच्या माठाचा वापर अजूनही कमी झालेला नाही. रेफ्रिजरेटरचे पाणी गरजेपेक्षा अधिक थंड असल्याने अनेकजण पिणे टाळतात. काही वर्षांपूर्वी माठांपेक्षाही मध्यप्रदेशातील इटारसीवरून येणाऱ्या मातीच्या पातळ  सुरई नागपूकरांची तहान भागवत होती. सुरईचा इटारसी ते नागपूर हा प्रवास आता थांबलेला आहे.

महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या अनेक रेल्वेगाडय़ांमधील तिकीट तपासणीसांसाठी नागपूर ते इटारसी असा ब्लॉक असायचा. इटारसी रेल्वेस्थानकावरच सुरई विक्रीसाठी असायच्या. विशेष म्हणजे, अतिशय नाजूक असलेल्या या सुरईतील पाणी खूप लवकर थंड होत होते. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक रेल्वे कर्मचारी येताना सोबत पाच ते सहा सुरई नागपुरात घेऊन येत असत. इटारसीला आठ ते बारा आण्याला मिळणारी सुरई नागपुरात मग तीन ते चार रुपयाला विकली जात होती.  काही वर्षांपूर्वीचा सुरईचा हा प्रवास आता थांबला आहे. मात्र, उपराजधानीत ज्यांनी या सुरईतील पाण्याचा आस्वाद घेतला आहे, त्यांच्यासाठी ती अजूनही आठवणीत आहे. सुरईच्या आकाराच्या, पण काहीशा निमुळत्या व उंच असणाऱ्या मातीच्या थर्मासने नागपूरकरांना वेड लावले आहे. कार्यालयात साधारणपणे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी ठेवले जाते. त्याऐवजी या मातीच्या, पण थर्माससारख्या असणाऱ्या पाण्याच्या बॉटल्स थंड पाण्यासाठी वापरता येतात. कोलकात्यातील विक्रेते हा नवा प्रकार उपराजधानीत यावर्षी पहिल्यांदाच घेऊन आले आहेत. नागपूरकरांच्या ते पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे, त्याला प्लास्टिकच्या बॉटल्सप्रमाणे झाकण देखील आहे.

सुरईच्या जागी मातीचे माठ

पचमढी येथे मी एका बैठकीसाठी गेलो होतो. त्यावेळी परतताना मी आवर्जून चार सुरया सोबत आणल्या होत्या. नागपूरला त्या विकायला येत नाहीत, कारण त्या अतिशय नाजूक असतात. शिवाय सुरईचा वापर आता कमी झाला असून त्याची जागा मातीच्या माठांनी घेतली आहे. तिथल्या सुरईप्रमाणेच केरसुणीसुद्धा तेवढीच प्रसिद्ध असल्याचे राम खांडेकर यांनी सांगितले.

बाजारपेठेवर परप्रांतीयांचा ताबा

जंगलातील माती माठ आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी अधिक चांगली समजली जाते. कुंभारांचा व्यवसाय या जंगलातल्या मातीवरच अवलंबून होता. या मातीवरचा हक्क वनखात्याने काढून घेतला आणि महाराष्ट्रातील कुंभारांच्या व्यवसायावर गदा आली. आतातलावाजवळील रेतीमिश्रित मातीचा वापर करून वस्तू घडवण्याचे काम ते करत आहेत. मात्र, त्यात असंख्य अडचणी आणि दुप्पट मेहनत आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक आदी राज्यातील कुंभार व्यावसायिकांनी त्यांचा माल येथे विक्रीला आणून बाजारपेठ काबीज केली आहे.

First Published on April 17, 2018 2:26 am

Web Title: clay water surai of itarsi supply stop in nagpur