पान शौकिनांना दुप्पट किंमतीचा फटका

नागपूर : बंगालमध्ये झालेला हवामानातील बदल व सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) च्या विरोधातील आंदोलनामुळे बाजारपेठा बंद पडल्याने विडा पान उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. परिणामी नागपुरात गोड पानाचे दर प्रति हजार नग १४ हजारांपर्यंत पोहचले आहेत. पानाच्या शौकिनांना याची दुप्पट किंमत मोजावी लागत आहे.

विदर्भात पश्चिम बंगाल येथून मोठय़ा प्रमाणात विडय़ाच्या गोड पानाची आवक होते. मात्र सध्या पानांची आवक मागणीच्या तुलनेत रोडावली आहे. हवामानातील बदलामुळे पानांचे उत्पादन यंदा कमी झाले आहे. त्याशिवाय सीएएच्या विरोधात बंगालमध्ये आंदोलन सुरू असून बाजरेठा बंद आहेत. सध्या बाजारात चांगल्या दर्जाच्या गोड पानाची किं मत ८ हजार ते १५ हजार रुपये प्रति १ हजार नग सुरू आहे. आता पुढे १५ दिवसापर्यंत अशीच स्थिती राहण्याची शक्यता  व्यापाऱ्यांनी  वर्तवली आहे. पानाचे भाव वाढल्याने पानठेल्यांवरही १० रुपयाच्या पानाची किंमत १५ रुपये झाली आहे. २५०० कपुरी पानाचा पेटारा ३०० ते ७०० रुपयांचा आहे. हवामानामुळे  अधिकतर गोड पाने खराब निघत आहेत. पान बाजारात ५० पेक्षा अधिक एजंट्स आहेत. जे टक्केवारीवर पानाची खरेदी-विक्री करतात. पानाच्या लिलावानंतर ते ग्राहकांपर्यंत पोहोचतात. अशाप्रकारेच संपूर्ण विदर्भात पानाचा पुरवठा के ला जातो. याशिवाय मध्यप्रदेशचे छिंदवाडा, भोपाळ, पांढुर्णा व  राजनांदगाव, रायपूपर्यंत पान शहराच्या बाजारातूनच जातात. व्यापाऱ्यांनुसार, येथून बाहेर पान पाठवणे अधिक सुविधाजनक मानले जाते. नागपूरसह संपूर्ण विदर्भात पान बाजाराच्या माध्यमातून वार्षिक २ कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय होतो. शहरात दररोज गोड आणि बंगला पानाच्या १ हजार  ते १ हजार २०० पेटाऱ्यांची विक्री होते. तसेच संपूर्ण विदर्भात कपुरी, बंगला आणि गोड पान मिळूनच १५ हजार  पान पेटाऱ्यांचा पुरवठा होतो. परंतु आता खराब हवामान आणि आंदोलनामुळे बंगाल आणि विजयवाडाहून पानाच्या वाहतुकीत अडचणी आल्या आहेत. पावसामुळेही पान तोडणी झाली नाही, त्याचाही फटका बसत आहे.