शाळांच्या मनमानी विरोधात पालकांचा संताप

नागपूर : मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून वारंवार शिक्षणमंत्र्यांकडून निर्देश देऊनही शाळांकडून शुल्क भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लावण्यात येत आहे. शुल्क भरण्यास असमर्थ असलेल्या पालकांच्या पाल्यांना ऑनलाईन वर्गातूनही काढण्यात येत असल्याचे प्रकार घडत आहेत. तरीही शिक्षणाधिकारी यांच्याकडून कुठलीच कार्यवाही होत नसल्याने मातांनी आज गुरुवारी कुलूपबंद शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चढून त्यांच्या कार्यालयात प्रवेश केला.

मोहननगर येथील सेंट जॉन प्रायमरी स्कूल या शाळेकडून पालकांना पूर्ण शुल्क भरण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे.  या शालेय प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात नागपूर एसओएस (सेव्ह अवर सोल्स)ने  पालकांसह शाळेत प्रवेश केला असता  प्रशासनाने त्यांना भेट दिली नाही. त्यानंतर पालक आणि नागपूर एसओएसच्या कार्यकर्त्यांसह शिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी शिक्षणाधिकारी यांनी कार्यालयातून पळ काढला. तसेच कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कुलूप लावून दार बंद केले. प्रशासनाकडूनही सहकार्य मिळत नसल्याने मुलांच्या शिक्षणासाठी मातांनी थेट बंद दारावर चढून कार्यालयात प्रवेश केला. यावेळी शिक्षणाधिकारी यांची चार तासांपर्यंत वाट बघूनही त्यांनी भेट झाली नसल्याने एसओएसच्या कार्यकर्त्यांसह पालकांनी  कर्मचाऱ्यांना निवेदन दिले. शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्याकडून शाळांना वारंवार निर्देश तसेच कारवाईचे इशारे देऊनही शाळांची मनमानी सुरु आहे. या समस्येवर तोडगा काढण्यात आला नाही तर शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा बंटी शेळके यांनी दिला.

शुल्क कमी करा, अन्यथा आंदोलन!

करोनामुळे अनेकांचा जीव गेला असून आर्थिक परिस्थितीही बिकट झाली आहे. असे असतानाही शहरातील सेंट पॉल शाळा विद्यार्थ्यांकडून विविध गोष्टींच्या नावावर अवास्तव शुल्क वसुली करीत आहे. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सेंट पॉल शाळेच्या संचालकांना निवेदन देत शुल्क कपात करण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. दोन वर्षांपासून करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील मध्यमवर्गीय व आर्थिकदृष्टय़ा मागासवर्गीय नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना व त्यांच्या आप्तेष्टांना करोनाची लागण झाली. तसेच रोजगार बुडाल्याने अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक या महामारीमुळे मृत्युमुखी पडले आहेत. अशा दुर्दैवी परिस्थितीतसुद्धा शाळेद्वारे असंवेदनशील वर्तणूक केली जात आहे. शाळेत शुल्क भरण्याकरिता विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव आणला जात असल्याचा आरोप अभाविपने निवेदनात केला आहे. शाळा बंद असतानाही ग्रंथालय, पार्किंगच्या नावावर शुल्क वसुली सुरूच आहे. विद्यार्थ्यांचे हे प्रश्न तात्काळ सोडवावे अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करेल, असा इशारा अभाविपचे महानगर मंत्री करण खंडाळे यांनी दिला आहे.