मुन्ना यादवला अटक करण्यात अपयश

गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, असे राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहीर कार्यक्रमातून सांगतात. मात्र, नागपूर पोलीस त्यांच्या या मार्गदर्शनाला हरताळ फासत असल्याचे चित्र मुन्ना यादव प्रकरणातून पुढे आले  आहे. गेल्या सहा महिन्यांपासून फरार यादव याला पोलीस अद्यापही अटक करू शकले नाही.

२१ ऑक्टोबरच्या रात्री मुन्ना यादव त्याच्या कुटुंबियांनी फटाके फोडण्याच्या वादातून मंगल यादव व त्यांच्या कुटुंबियांवर सशस्त्र हल्ला केला. त्या प्रकरणात धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव व इतरांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. तेव्हापासून मुन्ना यादव फरार आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यावर  या शाखेने राजकीय दबावासमोर लोटांगण घालून मुन्ना यादव व इतरांविरुद्धचे खुन्याच्या प्रयत्नाचे कलम वगळून केवळ मारहाण करून गंभीर जखमी करण्याचा गुन्हा कायम ठेवत भादंविच्या ३२६ कलमाखाली दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, अद्यापही यादव ला अटक झाली नाही.

दुसरीकडे, २५ मार्चला नागपूर पोलीस भवनाचे भूमिपुजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. तरच गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल. अन्यथा गुन्हे करूनही निर्दोष सुटता येते, अशी भावना समाजात निर्माण होईल, असे सांगितले. मात्र यादवच्या प्रकरणात नागपूर पोलीस खुद्द मुख्यमंत्र्यांच्या या मार्गदर्शनाला हरताळ फासत असल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन गांभीर्याने घेऊन मुन्ना यादवला पोलीस अटक करतील का, असा सवाल विरोधक करू लागले आहेत.

गुन्हेगारांना शिक्षा व्हावी

मुख्यमंत्री कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घालतील, असे वाटत नाही. शिवाय अनेक कार्यक्रमातून त्यांनी तसे जाहीरपणे सांगितले आहे. आता वेळ ‘कथनी आणि करनी’ची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी आरोपीला अटक करायला हवी.

विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, कॉंग्रेस.

तपास सुरू

या प्रकरणात गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. आरोपींच्या अटकेसंदर्भात पोलीस प्रयत्न करीत आहेत. याशिवाय अधिक काहीही सांगता येणार नाही.

संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.