मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शांतता क्षेत्रात आयोजित मेळाव्यात भाषण केल्याची बाब समोर आली असून लोकवस्तीत आणि शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी देणाऱ्या पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने रविवारी स्नेहनगर मैदानावर ‘धनगर आरक्षण निर्णायक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मैदानाच्या सभोवताल लोकवस्ती आहे. तसेच खासगी कोचिंग क्लासेस आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आले. स्नेहनगरात राहणाऱ्या डॉ. वर्षां ढवळे यांच्या घरासमोर परिसर शांतता क्षेत्र असल्याचा फलक लावण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात ध्वनिक्षेपक वापरण्याची परवानगी पोलीस खात्याकडे आहे. स्नेहनगरमधील हे मैदान प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. शांतता झोनमध्ये ध्वनिक्षेपक वापरण्यात येत असलेल्या कार्यक्रमाला परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रतापनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता, ही परवानगी विशेष शाखेने दिल्याचे सांगण्यात आले. या मैदानावर आतापर्यंत दोनदा मेळावा आयोजित करण्यात आला. हे येथे विशेष.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत असल्याचे दाखवत शहर पोलिसांनी अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शहरातील साऊंड सिस्टम चालकांनी पोलिसांविरोधात आंदोलन देखील केले होते. येथे मात्र चक्क मुख्यमंत्री शांतता क्षेत्रात भाषण देऊन मोकळे झाले आहेत. शांतता झोन लोकवस्ती, रुग्णालय, दवाखाने आणि नर्सिग होम असलेल्या परिसरात निश्चित केला जातो. तसेच शैक्षणिक संस्था, न्यायालय आणि न्यायिक प्राधिकरण आणि धार्मिक स्थळांपासून १०० मीटरचा परिसर शांतता झोन केला जातो. न्यायालयाच्या आदेशानंतर शांतता क्षेत्र निश्चित करून तशाप्रकारचे फलक लावणे बंधनकारक आहे.

शांतता क्षेत्रात ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. ध्वनिक्षेपक वापरायचे असल्यास पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. ध्वनिक्षेपकाचा कितीही कमी आवाज केला तरी त्याचा आवाज ७० डेसिबलपर्यंत जात असतो. शांतता क्षेत्रात ४० ते ४५ डेसिबलवर ध्वनी जायला नको. या ठिकाणी कुठल्या आधारावर परवानगी दिली हेच कळायला मार्ग नाही.

सुरेश चोपणे, सदस्य, रिजनल एम्पॉव्हरमेंट कमिटी,

केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालय.

वाहनतळाची सोय आणि व्यवस्थापकाच्या दृष्टीने मेळाव्यासाठी हे ठिकाणी सोयीचे होते. यापूर्वी ४ जानेवारी २०१५ ला याच ठिकाणी मेळावा घेतला होता. मुख्यमंत्री मेळाव्याला येणार असल्याने स्नेहनगरातील खूप जुन्या रस्त्याची समस्या सुटली. स्नेहनगर थेट वर्धा रोडला जोडला गेला. स्थानिक लोकांना थोडा त्रास झाला, पण रस्ता झाल्याने फायदा देखील झाला.

डॉ. विकास महात्मे, खासदार व मेळाव्याचे आयोजक