कृषी, पणन क्षेत्रात राज्य अव्वल

केंद्र सरकारने उद्योग सुरू करण्यासाठी सोयी उपलब्ध करून देण्याबाबत जाहीर केलेल्या अहवालात महाराष्ट्र ९व्या स्थानावर असल्याचे जाहीर केले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडण़वीस यांनी मात्र नागपूरला पत्रकारांशी बोलताना राज्याची परिस्थिती झपाटय़ाने सुधारत असून राज्य सर्वच क्षेत्रात प्रगती करीत असल्याचा दावा केला आहे.

केंद्र सरकारने राज्यांची क्रमवारी ठरविताना राज्यांनी दिलेल्या सात मुद्यांचा विचारच केला नाही. या मुद्दांचा विचार झाला असता तर राज्य कदाचित प्रथम क्रमांकावर आले असते. असे असले तरीही या क्षेत्रात राज्याने प्रगती साधली आहे. दोन वर्षांपूर्वी या क्रमवारीत महाराष्ट्र खूप मागे होता. राज्याला फक्त ४९ टक्केच गुण होते. यंदा ही टक्केवारी ९२ टक्केपर्यंत वाढली असून राज्य ‘लिडरशिप’ वर्गवारीत आले आहे. पुढच्या टप्प्यात आम्ही नक्कीच प्रगती साधू. नाकारलेल्या मुद्यांसंदर्भात आपण केंद्र सरकारशी चर्चा करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात विदेशी गुंतवणूक वाढली असून उद्योगक्षेत्रात आणि रोजगाराच्या क्षेत्रात आजही राज्य अव्वल स्थानी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

नीती आयोगाचा हवाला देत त्यांनी कृषी आणि पणन क्षेत्रात राज्य अव्वल असल्याचेही यावेळी जाहीर केले. या क्षेत्रात राज्याला ८१ टक्के गुण मिळाले आहेत. या क्षेत्रात सरकारने राबविलेल्या सुधारणेमुळेच ही बाब शक्य झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि राज्याच्या इतरही भागात प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यामुळेच ही बाब शक्य झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केवळ शेतमालाला भाव वाढवून देणेच गरजेचे नसून त्याच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करणे आवश्यक आहे. समृद्धी महामार्गावर गॅस आणि पेट्रोल वाहिनीचे चार प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक करू शकतील. त्याचप्रमाणे शेतमालाची ने-आण करण्यासही त्याचा फायदा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भाला दिल्याने इतरांच्या पोटात दुखण्याचे कारण नाही

विदर्भ आणि मराठवाडय़ावर अनेक वर्षांपासून सातत्याने अन्यायच होत आहे. आम्ही तो दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांच्या वाटय़ाचेच या मागास भागाला देण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यामुळे इतरांच्या पोटात याबाबत दुखण्याचे काहीही कारण नाही, असा टोला विदर्भाच्या नावाने टाहो फोडणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी हाणला.

राज्यात व केंद्रात सत्ताबदल झाल्यावर, तसेच राज्याची सत्तासुत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने विदर्भातील नेत्यांकडे आल्यावर विदर्भ आणि मराठवाडय़ाच्या विकासाला चालना देण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरू झाले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या इतर भागातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या पोटात दुखू लागले आहे.