नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील मुख्यमंत्री निवास असलेले रामगिरी येथील पाणीपुरवठा सोमवारी सकाळी खंडित झाला. महावितरणच्या कंत्राटदाराने येथे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे नुकसान केल्याची तक्रार ऑरेंज सिटी वॉटर वर्कने सदर पोलीस ठाण्यात केली आहे.

आज सकाळी ६ वाजतादरम्यान रविभवन मुख्यगेट समोर  मे. सेन्सिस इन्फ्रा या कंत्राटदार कंपनीचे  केबल टाकण्याचे काम सुरू होते. या दरम्यान  ३०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीचे नुकसान झाले.

जलवाहिनी फुटल्याने पाणी वाहून नेले. त्यामुळे रामगिरी, रविभवन आणि संपूर्ण  सिव्हिल लाईन्समधील पाणीपुरवठा  खंडित झाला. याशिवाय मरियमनगर, व्हीसीए स्टेडियम परिसर, जजेस क्वॉटर्स, लेडिज क्लब चौक, आरबीआय बँक, महापालिका सिव्हिल लाईन्स मुख्यालय आणि आयकर कार्यालय, जीएसटी भवन, उच्च न्यायालय आणि बीएसएनएल कॉलनी आणि सिव्हिल लाईन्समधील सर्व कार्यालयातील पाणीपुरवठयावर परिणाम झाला.