युवाशक्ती हा बॉम्ब आहे. त्याची वात पेटवण्याचं काम सरकारनं करू नये, असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. सध्या देशात अस्वस्थतेचं आणि अशांततेचं वातावरण आहे. केंद्र सरकार जे विद्यार्थ्यांसोबत करत आहे, ते अयोग्य असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली. नागपूरमध्ये त्यांनी पत्रकरांशी संवाद साधताना ते बोलत होते.

नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) भाष्य केलं. जामिया विद्यापीठात घडलेल्या प्रकाराचा त्यांनी निषेध केला. तसंच त्या ठिकाणी जे काही झालं ते जालियनवाला बाग सारखं झालं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली. विद्यार्थी हे एका बॉम्बप्रमाणे असतात. केंद्र सरकार जसं विद्यार्थ्यांसोबत करत आहे, तसं त्यांनी करू नये. आपला भारत देश हा तरूणांचा देश आहे. तरूण हे आपल्या देशाचा आधारस्तंभ आहेत. असंही ते यावेळी म्हणाले.

सामना हे वृत्तपत्र कधीही वाचत नाही असं सांगणाऱ्यांनी आज सभागृहात सामना दाखवला. याचाच अर्थ सामना हे सामान्य माणसाचं शस्त्र आहे हे सिद्ध झालं आहे. सामना तेव्हाच वाचला असता तर आमच्याशी सामना करण्याची वेळ आली नसती अशी टीका मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. विरोधकांना शिमगा करायचाच असेल तर केंद्र सरकारच्या नावाने करावा राज्य सरकारच्या नावाने करु नये असंही ते म्हणाले.

सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालू नये. विरोधकांनी आज घातलेला गोंधळ हा निंदनीय आहे. तुम्ही बोंबलून काहीही होणार नाही. बोंबलून प्रश्न मांडल्याने तुमचेच बिंग फुटते आहे असाही टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. शेतकऱ्यांना मी दिलेलं वचन हे त्यांच्या आणि माझ्यामधलं वचन आहे. शिवरायांच्या आशीर्वादाने मी ते वचन पाळणार आहे. तुम्ही आम्हाला ते करायला लावलं हे कोणालाही भासवू नये असंही त्यांनी स्पष्ट केलं.