अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे  हवामानात बदल होत पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. अगदी दिवसासुद्धा गरम व ऊबदार कपडय़ांची गरज जाणवत आहे. ही थंडी हवीहवीशी वाटत असली तरी आरोग्यासाठी मात्र घातक आहे. थंडीची मजा अनुभवण्यासाठी तरुणाईची धाव मात्र  शहरातील चौपाटी म्हणजे फुटाळ्यावर आहे. ही तरुणाई या बदललेल्या वातावरणाची मजा घेत आहे.

वातावरणातील या बदलापूर्वी विदर्भात सर्वत्र कोरडे हवामान होते. रात्रीची थंडीही जवळजवळ दूर पळाली होती आणि उन्हाळ्याची चाहूल जाणवायला लागली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सरासरीच्या वर असलेला कमाल तापमानाचा पारा खाली आला. नागपूर शहराचे तापमान चक्क दोन अंश सेल्सिअसने खाली आले. सध्याच्या स्थितीत कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे.

हंगामी संक्रमणाचा काळ असताना रविवारी सकाळी अचानक पावसाने प्रवेश केला आणि उष्ण जाणवणारे वातावरण पुन्हा थंड झाले. रविवारी नागपूरसह विदर्भातील काही शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे वातावरण अचानक गार झाले.

आणखी दोन दिवस..

हिवाळा संपत आला की पाऊस आणि गारपीट हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून तयार झाले आहे. पावसाळ्यात जेवढे नुकसान होत नाही, तेवढे नुकसान या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे होते. गेल्यावर्षी देखील जानेवारी महिन्यात नागपूर तसेच गोंदियामध्ये पाऊस झालेला होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस वातावरणात बदल अपेक्षित नाही. त्यामुळे आणखी दोन दिवस तरी नागपूरकरांना या कुडकुडत्या थंडीतच काढावे लागणार आहे.

गोंदिया, ब्रह्मपुरीचे कमी तापमान

शहरातील कमाल तापमान आज २७.२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १६.५ अंश सेल्सिअस होते. याव्यतिरिक्त कमाल तापमानात सर्वाधिक कमी तापमान गोंदियाचे २६.० अंश सेल्सिअस तर किमान तापमानात सर्वाधिक कमी तापमान ब्रम्हपुरीचे १४.३ अंश सेल्सिअस आहे.