||देवेश गोंडाणे

हिंगणघाटच्या घटनेवर महाविद्यालयीन तरुणाईच्या प्रतिक्रिया

नागपूर : हिंगणघाट येथील तरुणीची एकतर्फी प्रेमातून भर रस्त्यात एका तरुणाने पेट्रोलने जाळून हत्या केली. अशा घटना आता वाढत आहेत. तरुणींनी दिलेला नकार हा तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग आहे हे मान्य करायला तरुण तयारच नसतात.  मुलीने नकार दिला की  तिला संपवायचेच ही हिंसक मानसिकता आता आकार घ्यायला लागली आहे. ही विकृत मानसिकता बदलून  तरुणींच्या नकाराचे स्वातंत्र्य तरुणांनी स्वीकारायला हवे, अशी प्रतिक्रिया महाविद्यालयीन तरुणाईने ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.

पुरुषी मानसिकता संपवा

व्यक्तीस्वातंत्र्य हा प्रत्येक मुलीचा अधिकार आहे. तो प्रेमातही आहेच. त्यामुळे तिने कुणाचा प्रेमप्रस्ताव नाकारला तर तिच्या मताचा आदर व्हायला हवा.  एखादी मुलगी, स्त्री आपल्याला नकार देऊच कशी शकते ही पुरुषी मानसिकता संपणे गरजेचे आहे. – हर्षिता वाटमोडे

नैतिक शिक्षण द्या

प्राथमिक शिक्षणातून नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे आणि ते मुलांमध्ये रूजवणे फार गरजेचे आहे. याशिवाय अशा घटनांना आळा बसणार नाही. यासह घरांमध्ये मुलांशी मोकळा संवाद होणेही गरजेचे आहे. – सायली खराबे

नाहीचा अर्थ नाहीच समजा

जर तरुणी प्रेमाला नाही म्हणत असेल तर त्याचा अर्थ नाहीच समजायला हवा. तिच्या मागे पडून उत्तरात बदल होणार नाही. मुलांच्या अशा मागे लागल्याने अनेकदा मुलींवरच संशय घेतला जातो. समाजही त्यांच्या चारित्र्यावर संशय उपस्थित करतो. त्यामुळे कुणी मुलगी नकार देत असेल तर तो पचवायला शिका. स्त्री ही काही गुलाम नाही. नकार पचवायची मानसिकता मुलांनी तयार करणे आवश्यक आहे. – वैशाली हत्तीमार

तरुणांचे अमर्याद स्वातंत्र्य धोकादायक

मुला-मुलींमध्ये आजही भेदभाव केला जातो. अनेक घरांमध्ये मुलांच्या वागण्यावर स्वातंत्र्य आहे  तर दुसरीकडे मुलींना सातच्या आत घरातसारखे असंख्य नियम असतात. या भेदातूनच मुलांना दिलेले अधिकचे स्वातंत्र्य मुलींच्या जीवावर उठत आहे.

– चैताली चिकनकर प्रेम बळजबरीने कसे मिळवता येईल?

प्रेम ही अत्यंत चांगली गोष्ट असली तरी काही माथेफिरूंच्या हिंसक कृती त्याला गालबोट लावतात. मुलांच्या अशा वागण्याने मुलींच्या कुटुंबालाही समाज नावबोट ठेवतो. त्यामुळे तरुणांनी याचा विचार करायला हवा. प्रेम ही काही बळजबरीने मिळवणारी गोष्ट नाही.

– नेहा कौलिक