10 August 2020

News Flash

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या समितीकडून मेडिकलची झडती

कर्करोग विभागात कोबाल्ट उपकरण बंद असण्यासह समितीला इतरही काही त्रुटी निदर्शनात आल्या,

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तीन सदस्यीय समितीकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)ची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी समितीला मेडिकलमध्ये शिक्षकांची काही पदे रिक्त असण्यासह पायाभूत सुविधा कमी असल्याचे निदर्शनात आले. समिती आपला अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरूंना लवकरच सादर करणार असून त्यानंतर मेडिकलच्या विद्यापीठाशी संलग्नतेबाबतचा निर्णय होईल.
विद्यापीठाच्या निरीक्षण समितीचे नेतृत्व मुंबईच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे प्रा. डॉ. डी. एम. लांजेवार यांच्याकडे होते. समितीत धुळेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ. ए. डब्लू. पाटील, औरंगाबादचे डॉ. पवनकुमार डोंगरे यांचाही समावेश होता. समितीने सोमवारी सकाळपासून मेडिकलच्या प्रत्येक विभागात जाऊन शिक्षक, वरिष्ठ निवासी डॉक्टर, निवासी डॉक्टर यांच्यासह वर्ग दोनची भरलेली पदे, रिक्तपदांची माहिती घेतली. याप्रसंगी समितीला निवासी डॉक्टरांची संख्या फार कमी असण्यासह शिक्षकांचीही काही पदे रिक्त असल्याचे निदर्शनात आले. मेडिकलच्या छातीरोग विभागात वार्डाची स्थिती हलाकीची असून येथे इतरही बऱ्याच त्रुटी आढळल्या.
कर्करोग विभागात कोबाल्ट उपकरण बंद असण्यासह समितीला इतरही काही त्रुटी निदर्शनात आल्या, परंतु मेडिकल प्रशासनाकडून समितीला संस्थेत केल्या जात असलेल्या विविध शैक्षणिक गुणवत्ता व विकासात्मक कामाचीही माहिती देण्यात आली. समितीने विद्यार्थ्यांकरिता होणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेत विद्यार्थ्यांकरिता असलेल्या अनेक सुविधाही तपासल्याची माहिती आहे. समितीने मेडिकलच्या काही वार्डात जाऊन रुग्णसेवा व दर्जाही बघितला.
याप्रसंगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या व नसलेल्या औषधांचीही माहिती घेण्यात आली. समितीने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्यासह येथील बहुतांश विभागप्रमुखांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. समितीचे सदस्य लवकरच आपला अहवाल आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे सादर करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2016 3:21 am

Web Title: committee of health sciences university inspected government medical college and hospital
Next Stories
1 अपंगांच्या सुविधांपासून सिकलसेलग्रस्त वंचितच
2 सिंचन घोटाळाप्रकरणी विदर्भात पहिला गुन्हा दाखल
3 कर्करोगाच्या निदानासाठी आवश्यक रसायनाचा अभाव; रुग्णांच्या जीवाशी खेळ
Just Now!
X