नागपूर : मालकाचा खास माणूस असल्याने इतर कर्मचाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याला कंटाळून दोघांनी मिळून समृद्धी महामार्गाच्या बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्या एका कंपनीतील पारस रमेश निरंजने (२२) रा. दहेली, चंद्रपूर या कारचालकाचा दगडाने ठेचून खून केला. ही घटना बुधवारी रात्री हिंगणा पोलीस हद्दीतील कान्होलीबारा परिसरात घडली.

याप्रकरणी योगेश अरुण पातुरकर (३२) रा. हुडकेश्वर आणि पंकज कोल्हटकर (२२) रा. चंद्रोली, नरखेड अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या परिसरातील बांधकामाचे कंत्राट हैदराबाद येथील मेघा कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले आहे. या कंपनीने अभियंत्यांना लागणारी वाहने नागपुरातील एका कंपनीकडून भाडय़ाने घेतली आहेत. त्या टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीत पारस हा कारचालक होता व मालकाचा खास होता. त्यांना वाहन चालवण्यासाठी चालकांची आवश्यकता होती. त्यामुळे पारसने परिचयातील योगेशला कामावर ठेवले होते. पारस हा कान्होलीबारा परिसरातील मेघा कंपनीच्या तात्पुरत्या मुख्यालयात राहात होता.

कामादरम्यान योगेशकडून चूक होत असल्याने पारस हा त्याला वारंवार टाकून बोलायचा. यावरून दोघांमध्ये अनेकदा खटके उडाले. याचा वचपा काढण्यासाठी योगेशने पंकजच्या मदतीने पारसचा काटा काढण्याचा कट रचला. त्याला बुधवारी रात्री बिर्याणी खाण्यासाठी हिंगणा येथे सोबत येण्याची विनंती केली. कान्होलीबारा-हिंगणा मार्गावर अंधारात कार थांबवून त्याच्याशी भांडण केले. त्याच्यावर प्रथम कारच्या पान्याने डोक्यावर वार केले. नंतर दगडाने ठेचून खून केला.