* उपग्रहाद्वारे वजन मोजण्याची व्यवस्था वादात 

* माथनी पथकर नाक्याविरुद्ध पोलिसात तक्रार

केंद्र सरकारच्या आखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पथकर नाक्यांवर उपग्रहांद्वारे वाहनांतील मालाचे वजन मोजण्याची व्यवस्था वादात सापडली आहे. त्यात वास्तविकतेहून जास्त वजन दाखवले जात असल्याने वाहनधारकांची लूट होत आहे. यामुळे अप्रत्यक्षरीत्या वस्तूंचे दर वाढत आहेत. नागपूर जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील माथनी पथकर नाक्यावर वाहनधारकांची सर्रास लूट सुरू असून एक तक्रार नुकतीच मौदा पोलिसांकडे दाखल झाल्याने हा प्रकार पुढे आला.

केंद्र सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरील पथकर नाक्यांवर येणाऱ्या व्यावसायिक वाहनातील मालाचे वजन हे उपग्रहाच्या माध्यमातून करण्याच्या सूचना आहेत. नागपूर जिल्ह्य़ातही बहुतांश पथकर नाक्यांवर अशाच प्रकारे वजन होते. या व्यवस्थेचा उद्देश हा प्रत्येक वाहनचालकांचा वेळ वाचण्यासह पथकर नाक्यावरील व्यवहारात पारदर्शकता आणणे होता. सोबत नवीन नियमानुसार या वजनात ५ टक्के कमी वा जास्त फरक असल्यास त्यावर दंड न आकारण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या आहेत. नागपूर जिल्ह्य़ातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात या वाहनांची नोंदणी असल्यास नागपूर जिल्ह्य़ातील पथकर नाक्यावर या व्यावसायिक वाहनांना ५० टक्के सूट देण्याचाही नियम आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील माथनी पथकर नाक्यासह बहुतांश नाक्यांवर सर्रास या नियमांना हरताळ फासला जात आहे. त्यातच उपग्रहात दाखवल्या जाणाऱ्या वजन व वास्तविकतेतील वजनात मोठय़ा प्रमाणात तफावत असल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत. वजन जास्त असल्यास संबंधित वाहन चालकांकडून पथकर कंपन्या दहा टक्के दंड आकारतात. हा दंड शासनाच्या तिजोरीत जमा होणे अपेक्षित असताना जातो कुठे? हाही प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. वाहनांचे वजन इतर वजन काटय़ांवर केल्यास ते कमी भरत असल्याचा धक्कादायक प्रकारही अनेक वाहनचालकांच्या निदर्शनात आला. अवैध दंडाच्या माध्यमातून वाहनधारकांची लूट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकाराने वस्तूंचा परिवहन खर्च वाढत असल्याने तो निश्चितच ग्राहकांकडूनच वस्तूंचे दर वाढवून वसूल केला जातो. त्याने महागाईही वाढण्यास मदत होत आहे. हा गंभीर प्रकार असतांनाही त्याकडे संबंधित विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. नुकतेच माथनी पथकर नाक्यावर एका ट्रकचे वजन उपग्रहाच्या माध्यमातून केल्यावर भरलेल्या वजनात व वजन काटय़ावर केलेल्या वजनात १,२०० किलो वजनाचा फरक पडला. एका पेट्रोलच्या वाहनातही असला प्रकार घडल्याचे पुढे आल्याने या माथनी पथकर नाका कंपनीच्याविरोधात मौदा पोलिसांत राजेंद्र गुणवंतराव वैद्य यांनी तक्रार दाखल केली. सर्वसामान्यांशी संबंधित विषय असल्याने तातडीने शासन या प्रकाराची तपासणीकरून संबंधित कंपनीवर कारवाई करणार काय? हा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत.

वाहनधारकांच्या वेळेचा अपव्यय : केंद्र सरकारने वेळ वाचणार असल्याचे सांगत राष्ट्रीय महामार्गावर उपग्रहाद्वारे चालत्या वाहनांचे वजन मोजण्याचे अद्यावत तंत्र आणले. परंतु त्यात वास्तविकतेहून जास्त वजन येत असल्याचे पुढे आले आहे. सोबत या व्यवस्थेनंतरही पथकर नाक्यांवर वाहनधारकांच्या रांगा लागत असल्याने अनेकदा वाहतूकही विस्कळीत होते. तेव्हा वेळेचा अपव्यय होणार असेल तर ही व्यवस्था काय कामाची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातच वाहनधारकांकडून या नाक्यांवर इतर पद्धतीनेही वजन करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी पुढे येत आहे.