आयुक्तांकडून कारवाईचा इशारा

नागपूर : शहरातील करोना बाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत असताना करोना चाचण्यांमध्ये अनियमितता दिसून येत  आहे. या संदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याबाबत कुठल्याही प्रकारचा कामचुकारपणा निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाºयावर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिला आहे.

चाचणी केल्यानंतर रुग्ण कुणाच्याही संपर्कात येऊ नये व त्याला त्वरित उपचार मिळावे यासाठी अहवाल लवकर मिळणे आवश्यक आहे. चाचणी केल्यानंतर दोन दिवस अहवाल मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. सर्व शासकीय व खाजगी प्रयोग शाळेतील  चाचणीचा अहवाल २४ तासांच्या आत द्या, असे निर्देश आयुक्तांनी दिले.  ‘करोना वार रूम’मध्ये  सर्व शासकीय व खाजगी लॅबच्या डॉक्टरांची विशेष बैठक आयोजित केली होती त्यात हे निर्देश देण्यात आले.  शिवाय करोना चाचणी करताना खाजगी प्रयोगशाळेत घेण्यात येणारे शुल्क शासकीय दरानुसार घेण्यात यावे. जास्त पैसे घेतल्यास आणि त्याबाबत तक्रारी आल्यास  कारवाई करण्यात येईल. चाचणीसाठी येणाऱ्याप्रत्येक व्यक्तीची नोंदणी करताना त्याचा संपूर्ण पत्ता व मोबाईल क्रमांक घेणे अनिवार्य आहे. पत्ता अचूक नसल्यास संबंधित रूग्णाचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ होऊ शकणार नाही व रुग्णांची संख्या वाढतच राहिल. त्यामुळे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’मध्ये कुठलीही अडचण येऊ नये यासाठी नागरिकांनीही आपला अचूक पत्ता व मोबाईल क्रमांक नमूद करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.