तपासणीसाठी आरडीएसओ चमू शहरात दाखल

सुरक्षा आयुक्तांच्या तपासणी दौऱ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी महामेट्रोची यंत्रणा रात्रंदिवस युद्धपातळीवर राबत असली तरी स्थानकांचे बांधकाम, विद्युतीकरणासह इतरही तांत्रिक कामे अपूर्ण आहेत. दरम्यान, खापरी ते बर्डी या मार्गाच्या तपासणीसाठी  आरडीएसओची चमू नागपुरात आले आहे. या चमूच्या पाहणीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्त तपासणी करतील व त्यानतंरच मेट्रोच्या व्यावसायिक संचालनास मान्यता मिळेल.

नागपूर मेट्रो रेल्वेच्या वर्धा मार्गावरील खापरी ते सीताबर्डी या दरम्यानच्या मार्गाची तपासणी करण्यासाठी आरडीएसओ (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) आली आहे आणि त्यानंतर २६ तारखेला रेल्वे सुरक्षा आयुक्तांची चमू येणार आहे. मेट्रो मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी या दोन्ही चमूंच्या तपासण्या महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या ना-हरकतीनंतरच प्रवासी वाहतुकीला हिरवा कंदील मिळतो. यापूर्वी खापरी ते दक्षिण विमानतळ या मार्गाची तपासणी वरील यंत्रणांनी केली होती व त्यानंतर या मार्गावर मेट्रोची चाचणी सुरू झाली. आता त्यापुढच्या म्हणजे एअरपोर्ट ते बर्डी या मार्गाच्या तपासणीसाठी चमू येत आहे. ही चमू ट्रॅक, विद्युतीकरण (ओव्हर हेड), ब्रेक सिस्टीम, निर्वासन प्रणाली, स्थानकांवरील प्रवाशांच्या सुविधा आणि इतरही तांत्रिक बाबींची तपासणी करणार आहे.

महामेट्रोने वरील मार्गावर २६ फेब्रुवारीनंतर मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू होईल, असे जाहीर केले आहे. निर्धारित वेळेत प्रकल्पाचे कार्य पूर्ण करण्यासाठी १२ हजार अधिकारी/कर्मचारी दिवस रात्र काम करीत आहेत. यापैकी ४५० ते ५०० कर्मचारी सीताबर्डी जंक्शन स्थानकावर काम करीत आहेत. येत्या ३-४ दिवसात पूर्ण करणार असल्याचा दावा महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी केला आहे. मात्र, सध्या तांत्रिक आणि बांधकामाची अनेक कामे अपूर्ण आहेत. सध्या वर्धा मार्गावरील फक्त तीन स्थानकांची कामे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. एअरपोर्ट स्थानकावर आणि बर्डीच्या जंक्शन स्थानकाची अनेक कामे अपूर्ण आहेत.

कितीही वेगाने काम केले तरी निर्धारित वेळेत ती पूर्ण होणे अशक्य असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. या पाश्र्वभूमीवर आरडीएसओ तसेच रेल्वे सुरक्षा आयुक्त अर्धवट कामांची पाहणी व तपासणी करणार का, असा सवाल केला जात आहे. सर्वसाधारणपणे रेल्वे सुरक्षा आयुक्त स्थानक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत सर्व कामे पूर्ण झाल्यावरच तपासणी करतात. तीन स्थानके सोडली तर इतर ठिकाणी अशी स्थिती नाही हे येथे उल्लेखनीय.