सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचा पुढाकार

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)शी संलग्नित सुपरस्पेशालिटी रुग्णालयात सोमवारी करोना बाधित अत्यवस्थ हृदयरुग्णावर गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया केली गेली. या पद्धतीची करोनाबाधितावर सुपरस्पेशालिटीतील ही पहिलीच शस्त्रक्रिया आहे. दरम्यान, या रुग्णावर बाधित असल्याने शस्त्रक्रिया होत नसल्याने नातेवाईकांनी प्रथम संताप व्यक्त केला होता. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी पुढाकार घेतल्यावर शस्त्रक्रिया झाली.

शस्त्रक्रिया झालेली ५१ वर्षीय महिला वर्धा जिल्ह्य़ातील आहे. तिच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. प्रथम ती उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात गेली असता तेथे तिची चाचणी नकारात्मक आली होती. परंतु मेडिकलमध्ये दाखल झाल्यावर झालेल्या चाचणीत तिला करोना असल्याचे निदान झाले. तिला करोनाची फारशी लक्षणे नव्हती.

वैद्यकीय चाचणीत तिच्या हृदयाला रक्तपुरवठा करणारी एक वाहिनी पूर्णपणे अडथळ्यामुळे बंद पडल्याचे पुढे आले. वेळीच शस्त्रक्रिया न झाल्यास तिच्या जीवितालाही धोका होता. परंतु सुपरस्पेशालिटीतील डॉक्टरांकडून करोनाचे उपचार पूर्ण झाल्यावर हृदय शस्त्रक्रिया शक्य असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे नातेवाईक तातडीने शस्त्रक्रिया

होत नसल्याने संताप व्यक्त करत होते. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी मध्यस्ती करत तातडीने शस्त्रक्रिया सोमवारीच करण्याचे नियोजन केले. सायंकाळी उशिरापर्यंत ही शस्त्रक्रिया सुरू होती. करोना बाधितावर सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील ही पहिलीच गुंतागुंतीची ओपन हार्ट शस्त्रक्रिया आहे.