महेश बोकडे

करोनाच्या रुग्णांवर एकीकडे औषधोपचार करताना दुसरीकडे त्या रुग्णाच्या कौटुंबिक भावभावनांची नाजूक वीण हळुवारपणे जपण्याचे आव्हान वैद्यकीय तज्ज्ञांना पेलावे लागत आहे. आई-वडील करोनाबाधित झाले, तर त्यांच्या निरोगी चिमुरडय़ांना ठेवायचे कुठे, किंवा निरोगी आई-वडिलांना सोडून न राहणाऱ्या बालरुग्णावर उपचार कसे करायचे, असा भावनिक गुंता सोडविण्याची कसरतही डॉक्टरांना करावी लागत आहे!

भावनिक पेच निर्माण करणारी अशी उदाहरणे रोज समोर येत आहेत. नागपुरातल्या दोन ताज्या उदाहरणांनी करोनामुळे निर्माण झालेली ही समस्या आणखी ठळकपणे अधोरेखित केली आहे.

नागपूरमध्ये सोमवारी मिळालेल्या करोना चाचण्यांच्या अहवालानुसार, ४० वर्षीय व्यक्ती आणि त्यांच्या ३५ वर्षीय पत्नीला करोनाची बाधा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या बारा वर्षांखालील दोन मुलांचा अहवाल मात्र नकारात्मक आला. ही मुले आई-वडिलांशिवाय राहत नाहीत. त्यामुळे आई-वडिलांना रुग्णालयात दाखल केल्यास या दोन मुलांना कुठे ठेवायचे, हा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. या कुटुंबाचे सर्व नातेवाईक सक्तीच्या विलगीकरणात असून ते मुलांचा सांभाळ करू शकत नाहीत. त्यामुळे मुलांनाही आमच्यासोबत रुग्णालयात दाखल करा, असा आई-वडिलांचा आग्रह होता. या आग्रहाने डॉक्टर पेचात पडले. या मुलांना रुग्णालयात ठेवल्यास त्यांना संक्रमणाचा धोका आहे.

दुसऱ्या प्रकरणात एका ११ वर्षीय मुलीला करोनाची बाधा झाली आहे. परंतु, तिच्या आई-वडिलांचा अहवाल मात्र नकारात्मक आहे. लहान मुलीला एकटे रुग्णालयात दाखल करण्यास पालक तयार नव्हते.

समुपदेशनातून मार्ग

दोन्ही प्रकारामुळे सकाळी करोनाग्रस्त असलेल्या दोन्ही कुटुंबातील सदस्यांना सायंकाळी उशिरापर्यंत रुग्णालयात दाखल करता आले नाही. हा प्रकार आमदार निवासातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनासह महापालिका प्रशासनाला कळवला. दरम्यान अधिकाऱ्यांनी दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन सुरू केले. त्यानंतर ११ वर्षीय करोनाग्रस्त मुलीसोबत तिच्या आईला ‘मेयो’त पाठवण्यात आले, तर दोन मुलींना त्यांच्या विलगीकरणात असलेल्या नातेवाईकाची मनधरणी करत येथे ठेवले गेले. या वृत्ताला आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.