महापालिका, नासुप्रसह सर्वच पातळीवर उदासीनता

नागपूर : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांबाबत महापालिका, नासुप्रसह सर्वच पातळीवर उदासीनता दिसत आहे. गणरायाचे आगमन झाल्यानंतर महापौरानी वारंवार आदेश देऊनही या खड्डय़ांची स्थिती जैसे थे आहे. तीन दिवसावर आलेल्या विसर्जनावेळी विविध भागातील तलावाजवळ खड्डे पडलेल्या रस्त्यावरूनच गणेश मंडळाचे गणपती व नागरिकांना कसरत करत जावे लागणार आहे.

महापालिकेच्या निवडणुका सहा महिन्यांवर आल्या असून विद्यमान सदस्य तयारीला लागले आहेत. शहरात महापालिकेसह नागपूर सुधार प्रन्यास आणि सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या अनेक रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत.

महापालिकेत या मुद्यावरून नुकतीच सत्तापक्षासह विरोधकांनी प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली. यावर प्रशासनाने निधी नसल्याने  ६० टक्के रस्त्यावरील खड्डे गेल्या दीड वर्षांत बुजवले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आता गणरायाचे विसर्जन तीन दिवसांवर आले असून सार्वजानिक गणेश मंडळांना मिरवणूक काढण्याची मंजुरी नसली तरी गणेश मंडळांच्या वाहनांना खड्डे असलेल्या रस्त्यातून जावे लागणार आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. महापालिकेत गेल्या काही दिवसात सदस्य आपल्या प्रभागातील विकास कामाची फाईल कशी मंजुरी होईल, या कामातच नगरसेवक व्यस्त आहेत. त्यामुळे  खड्डय़ावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात सामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे.

खड्डे बुजविण्यासाठी २ कोटींवर खर्च

अर्थसंकल्पातील अन्य पदांमधील खर्च न झालेला निधी खड्डे दुरुस्तीसाठी समायोजित करण्याचे महापौरांनी निर्देश देऊ न आठ दिवस लोटले. परंतु प्रशासनाला खड्डे बुजवण्याबाबत गांभीर्य नाही. गेल्या दोन वर्षांत खड्डे बुजवण्यावर महापालिका प्रशासनाने २ कोटी ३० लाख रुपये खर्च केले. त्यातील काही खड्डय़ातील गिट्टी पुन्हा बाहेर येऊन खड्डे तयार झाले आहेत. शहरातील खड्डय़ांचा आलेख केवळ एका वर्षांत वाढला नाही. गेल्या तीन वर्षांंपासून रस्ते दुरुस्तीच झाली नाही. २०१९-२० या वर्षांतील तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी मंजूर केलेल्या रस्त्यांसाठी निधी मंजूर होऊन कामे झाली नाही.

गणेश विसर्जनापूर्वी शहरातील विविध भागातील तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर डांबरीकरण केले जात आहे. त्या परिसरातील खड्डे बुजवले जात आहे. काही ठिकाणी खाजगी कंपन्यांची कामे सुरू असल्यामुळे खड्डे खोदले आहे. यावर्षी तलावात विसर्जन करता येणार नाही. तलावाजवळ तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टाक्यात विसर्जन करावे लागणार आहे. त्यामुळे विसर्जनापूर्वी तलावाकडे जाणारे मार्गावरील रस्त्यावरील खड्डे  बुजवून रस्ते चांगले करण्यात येईल.

– प्रकाश भोयर, स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका