* मनमानी खपवून घेणार नाही -भाजप * आर्थिक स्थिती तपासूनच निर्णय घेणार – आयुक्त

नागपूर :  नगरसेवकांशी संवाद नाही, कार्यादेश दिलेली कामे थांबवणे, यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी याबाबत आपली नाराजी आयुक्तांकडे व्यक्त केली. मनमानी कारभार चालणार नाही, असा इशाराही दिला तर  मला जे निर्णय घ्यायचे ते नियमात आणि महापालिकेची आर्थिक स्थिती बघूनच  घेणार, अशा शब्दात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी  नगरसेवकांना ठणकावले. यामुळे भविष्यात सत्ताधारी पक्ष विरुद्ध आयुक्त असा संघर्ष निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर  प्रथमच त्यांनी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांना भेटण्यासाठी आज मंगळवारी सांयकाळी साडेपाच वाजताची वेळ दिली.  सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांच्या नेतृत्वात भाजपचे सर्व नगरसेवक आयुक्तांना भेटले. या भेटीत त्यांनी आयुक्तांवर प्रश्नांचा भडिमार करीत त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली. कार्यादेश दिलेली विकास कामे थांबवल्याने संताप व्यक्त केला.

भेटीसाठी निर्धारित १५ मिनिटांची वेळ अपुरी असल्याचे ते म्हणाले. प्रथम संदीप जाधव यांनी भूमिका मांडली व नंतर सर्व नगरसेवकांनी भावना व्यक्त केल्या. नगरसेवकांशी  संवाद नाही. एकांगी कारभार सहन करणार नाही, असे रवींद्र भोयर म्हणाले.

खासदार निधीमधून करण्यात येणारी कामे थांबवल्याचा आरोप प्रकाश भोयर यांनी केला तर दिलीप दिवे यांनी सभागृहाने मंजूर केलेल्या सहा इंग्रजी शाळांचा मुद्दा उपस्थित केला. आजपर्यंत आलेले आयुक्त असे वागले नाही अशी टीका त्यांनी केली. ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल यांनी नगरसेवकांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या.

चर्चा सुरू असताना सुरक्षा रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यास नगरसेवकांनी सांगितले.

मुंढे यांनी सर्वाचे म्हणणे ऐकून घेतले. महापालिकेची आर्थिक स्थिती बघून कुठल्या कामांना प्राधान्य द्यावे हे मी ठरवणार, असे नंतर मुंढे यांनी नगरसेवकांना सांगितले. त्यानंतर बैठक आटोपली.

या निमित्ताने सत्ताधारी भाजप आणि आयुक्त यांच्यात संघर्षांची पहिली ठिणगी पडली असून याचे पडसाद गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची चिन्हे आहेत.

सुरू असलेली कामे थांबवली नाहीत

कुठल्याही नगरसेवकाला भेट  नाकारली नाही. कामानिमित्त नगरसेवकांशी संवाद साधतो. महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा विचार करूनच विकास कामांना प्राधान्य देणार आहे. जी कामे सुरू झाली नाहीत ती   थांबवली. सुरू असलेली कामे थांबवली नाहीत.

– तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका.

पुढील निर्णय लवकरच
नगरसेवकांनी आपली बाजू मांडली. आयुक्त त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. पुढील निर्णय आम्ही लवकरच निर्णय घेऊ.

– संदीप जाधव, सत्तापक्ष नेता.