|| देवेश गोंडाणे
तीन अर्ज भरूनही उमेदवारांना एकाच पदासाठी संधी
नागपूर : आरोग्य विभागाच्या २८ फेब्रुवारीला होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांकडून दोन ते तीन पदांसाठी शुल्कासह अर्ज स्वीकारण्यात आले असले, तरी या तीनही पदांची परीक्षा आता एकाच दिवशी होणार आहे. त्यामुळे परीक्षार्थींना कुठलीही एकच परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रासाठी दिलेला प्राधान्यक्रम बदलून पुण्याच्या विद्यार्थ्यांना चंद्रपूर, गडचिरोली, तर नागपूरच्या उमेदवारास पुणे, ठाणे असे परीक्षा केंद्र दिल्याने परीक्षा नियोजन करणाऱ्या खासगी कंपनीने परीक्षेआधीच गोंधळ घातला आहे.
आरोग्य विभागात १७ हजार जागा रिक्त असून त्यातील ५० टक्के म्हणजे साडेआठ हजार जागांसाठी २८ फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे. ही परीक्षा शासनाच्या ‘महाआयटी’ कंपनीने नेमलेल्या खासगी कंपन्यांकडून ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. आरोग्य विभागातील मानसशास्त्रज्ञ, भौतिकोपचारतज्ज्ञ, समुपदेशक, कनिष्ठ लिपिक, सामाजिक पर्यवेक्षक अशा विविध पदांसाठी २०१९ला महापरीक्षा संकेतस्थळावर अर्ज भरण्यात आले होते. अर्ज करताना उमेदवारांना एकाच पदासाठी एकच अर्ज करता येईल, अशी कुठलीही अट घालण्यात आलेली नव्हती. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी पात्र असणाऱ्या दोन ते तीन पदांसाठी अर्ज केले. यासाठी मागास वर्गाला ३००, तर सामान्य वर्गाला ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले होते. उमेदवारांकडून तीन अर्ज स्वीकारण्यात आल्याने तीनही पदांसाठी परीक्षा देणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, महाआयटीने २८ फेब्रुवारीच्या परीक्षांचे प्रवेश पत्र आज रविवारी उमेदवारांना देताच परीक्षा नियोजनातील गोंधळ समोर आला. या सर्व परीक्षा राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुका केंद्रांवर एकाच दिवशी होणार असल्याने तीन अर्जांचा स्वीकार करूनही उमेदवारांना एकच परीक्षा देता येणार आहे.
मराठा विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्य जिल्ह्यातील केंद्र द्यावे!
- आरोग्य खात्याच्या परीक्षांसाठी मराठा उमेदवारांनी अर्ज केल्यानुसार प्रवेश पत्र वितरित करावे व प्राधान्याच्या जिल्ह्यामध्येच परीक्षा केंद्र द्यावे, अशी मागणी विनोद पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
- आरोग्य विभागाच्या २०१९ मधील जाहिरातीमध्ये ५२ ठिकाणी उमेदवार अर्ज करू शकतील, असे म्हटले होते. काहींनी आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला. परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती आल्यानंतर राज्य सरकारने अशा विद्यार्थ्यांना संवर्ग (कॅटेगरी) बदलण्याची मुभा दिली. काहींनी आर्थिक मागास (ईडब्ल्यूएस) संवर्गात अर्ज केला आहे. परंतु राज्य सरकारने अशा उमेदवारांना दोनच पदांसाठी परीक्षा देण्यासाठी प्रवेश पत्र वितरित केले. तसेच एखादा विद्यार्थी एखादा विषय सकाळी मुंबईला परीक्षा देत असेल तर त्याच विद्याथ्र्याला औरंगाबाद मध्ये दुपारी दुसऱ्या विषयाची परीक्षा द्यावी लागेल.
- कोणत्या पदासाठी व जिल्ह्यात परीक्षा द्यायची, हे राज्य सरकारने न ठरविता उमेदवाराला ठरवू द्यावे, त्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्वरित जाण्यासाठी कुठलीही यंत्रणा उपलब्ध करून देईल का त्याचा खुलासा करावा, असे पाटील यांनी म्हटले आहे.
घोळ काय?
- ज्या परीक्षार्थींनी पुणे, सातारा, सांगली ही परीक्षा केंद्रे प्राधान्यक्रमाने निवडली होती त्यांना विदर्भ, मराठवाड्यातील गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, औरंगाबाद, अकोला हे केंद्र देण्यात आले.
- शिवाय काही विद्यार्थ्यांना जे केंद्रच निवडले नव्हते ते परीक्षा केंद्र देण्यात आले. परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीला साधे परीक्षा केंद्रांचे नियोजन करता न आल्याने ही कंपनी परीक्षा कशा घेणार, यावरही विद्यार्थ्यांमध्ये शंका आहे.
- त्याचप्रमाणे राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या, टाळेबंदीसदृश स्थिती बघता विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 12:00 am